डॉ. आंबेडकर संशोधन केंद्र कागदारवरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आंबेडकर संशोधन केंद्र कागदारवरच
डॉ. आंबेडकर संशोधन केंद्र कागदारवरच

डॉ. आंबेडकर संशोधन केंद्र कागदारवरच

sakal_logo
By

संजीव भागवत
मुंबई, ता. ४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर आजतागायत या केंद्राची साधी पायाभरणीही विद्यापीठ प्रशासनाने केली नाही. सरकारनेही निधी उपलब्ध करून देण्यासाठी अनास्था दाखवल्याने हे आंतरराष्ट्रीय केंद्र केवळ कागदावरच राहिले आहे.

तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ६ डिसेंबर २०२० रोजी आंतररष्ट्रीय संशोधन केंद्राचे भूमिपूजन केले होते. जगभरातील विद्यार्थी या केंद्रात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर संशोधन करतील, त्यासाठीची सर्व सुसज्जता आणि आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा असलेले हे केंद्र उभे राहणार असल्याची घोषणा केली होती. या केंद्राला पूर्णवेळ संचालक आणि कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यासाठी मान्यताही देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यापीठात या केंद्राचा कारभार एका छोट्याशा खोलीत बंद झाला आहे. डॉ. आंबेडकरांच्या नावाने उभ्या राहणाऱ्या या केंद्रासाठी जाणीवपूर्वक अशी दिरंगाई विद्यापीठ प्रशासन आणि सरकारनेही केल्याचा आरोप केला जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने मागील वर्षी या केंद्रासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली होती; तर यंदाच्या अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद केली आहे, पण या केंद्राच्या निर्मितीसाठी आतापर्यंत एक रुपयाचाही खर्च करण्यात आला नाही. पूर्णवेळ संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असताना दोन वर्षांत विद्यापीठाने त्यासाठीही दिरंगाई केल्याचे सांगण्यात आले.

या केंद्रात प्रामुख्याने देश-विदेशांतील तरुण, संशोधक, विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर संशोधन करतील अशी संकल्पना आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधी उपलब्ध केल्या जाणार होत्या. अद्ययावत ग्रंथालयांपासून इतर अनेक विभाग येथे विकसित केले जाणार होते. संशोधनासह प्रशिक्षण, विविध प्रकारचे अभ्यासक्रम येथे उपलब्ध केले जाणार होते. त्यात ४ अभ्यासक्रम प्रमुख होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यासोबत त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि देशाच्या जडणघडणीतील योगदानासाठी जगभरातील विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श आंतरराष्ट्रीय केंद्र उभे करण्याचे नियोजन होते. त्यामुळे येथे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात आंबेडकर विचार, सांस्कृतिक आणि बुद्धि‌स्ट स्टडीज यांचा समावेश होता.
---
प्रस्तावाची फाईल मंत्रालयात पडून
तत्कालीन सरकारकडे इमारत, पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम, ग्रंथालय आदींसाठी प्रझेंटेशन करण्यात आले होते. त्यासाठी पाच कोटींचा प्रस्तावही सादर करण्यात आला; मात्र पुढे त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने त्यासाठी मिळणाऱ्या निधीची आणि त्याच्या मंजुरीची फाईल मंत्रालयात धूळ खात पडून असल्याचे सांगण्यात आले.
---
प्राध्यापकांचीही वानवा
या केंद्रासाठी संचालक पदासह दहा सहायक प्राध्यापक, चार सहयोगी प्राध्यापक आणि पाच संशोधक सहायक ही पदे प्रस्तावित होती. त्यातील सर्वच पदांच्या मान्यतेचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. सध्या या केंद्रात पदव्युत्तर आणि पीएच.डी.चे अभ्यासक्रम सुरू असले, तरी त्यासाठी एकही पूर्णवेळ प्राध्यापक, विभागप्रमुख अथवा संचालक नाहीत. प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. अलीकडे प्राध्यापक पदांसाठी ७ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या नियुक्त्या मात्र आतापर्यंत होऊ शकल्या नाहीत.
---
नॅकसाठी अभ्यासक्रम दाखवण्याची घाई
मुंबई विद्यापीठाने नॅकचे नामांकन मिळवण्यासाठी या केंद्रात दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असल्याची खोटी माहिती सादर केली. ते अभ्यासक्रम अजूनही उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्या अभ्यासक्रमांसाठी कोणतीही अभ्यास मंडळेच नाहीत. त्यामुळे त्यांना मान्यताही मिळू शकली नाही. त्यात एम.ए. इन बुद्धिस्ट स्टडी आणि एम.ए. इन सोशल पॉलिसी या अभ्यासक्रमांचा समावेश होता.

--
मुंबई विद्यापीठात दोन वर्षे झाली तरी डॉ. आंबेडकरांच्या नावाचे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभे राहत नाही. त्याचे साधे कामकाजही सुरू होऊ शकले नाही हे दुर्दैव आहे. तत्कालीन सरकार आणि मुंबई विद्यापीठही यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे विद्यमान सरकारने याचा विचार करून हे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- आनंदराज आंबेडकर, अध्यक्ष, रिपब्लिकन सेना
-----
अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट
विद्यापीठातील या केंद्राच्या झालेल्या दिरंगाईवर बोलण्यासाठी प्रभारी कुलसचिव सुनील भिरूड यांच्याशी अनेकदा संपर्क साधूनही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याविषयी बोलणे टाळले. त्यामुळे विद्यापीठाकडून या विषयावर कोणीही बाजू सांगण्याचे धाडस करू शकले नाही.