
भिवंडीतील पीएमएवाय प्रकल्प म्हाडाकडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेमार्फत चाविंद्रा/ पोगाव येथील जागेवर पंतप्रधान आवास योजनेतील ६ हजार ३४८ घरांचा प्रकल्प म्हाडाने हाती घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. म्हाडा आणि भिवंडी निजामपूर महापालिकेने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत.
भिवंडी निजामपूर शहर महापालिकेने चाविंद्रा/ पोगाव येथील आरक्षित जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता प्रकल्प हाती घेतला होता; मात्र हा प्रकल्प इतर प्राधिकरणाने राबवण्याचा ठराव महासभेने केला होता. त्यानुसार नगरविकास विभागाने हा प्रकल्प पंतप्रधान आवास योजना राबवण्याचा अनुभव असलेल्या म्हाडाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प ६ हजार ३४८ घरांचा आहे. या प्रकल्पातील ३० टक्के अल्प घटकासाठीचे बांधकाम व १० टक्के वाणिज्यिक बांधकाम मोबदला भिवंडी निजामपूर शहर महापालिकेला द्यावा, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि भिवंडी जिजांपूर महापालिका अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही तिले आहेत.