
मुंबईत आज तेरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद
मुंबई, ता. ३ : ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी’ या मुख्य विषयावर शिक्षण विकास मंच आयोजित १३ वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद रविवारी (ता. ४) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली आहे.
एक दिवसाच्या या शिक्षण परिषदेत सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्यातील पालक, शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या मनातील शंका आणि त्यांची मनोभूमिका, शासनाची भूमिका इत्यादी बाबींवर सर्वंकष चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या परिषदेत पहिल्या सत्रात पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार या वेळी प्रदान केले जाणार असून या सत्रातील बीजभाषण हे डॉ. सुनीलकुमार लवटे हे करतील. दुसऱ्या सत्रात अंमलबजावणीबाबतची निवडक सादरीकरणे केली जातील. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.