
उद्योगांसाठी महाराष्ट्र अव्वल
मुंबई : भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुइंग बिझनेस मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल आहे, असे यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात नमूद केले आहे. कौन्सिलच्या आठव्या वार्षिक अहवालात भारतातील व्यावसायिक वातावरणाविषयी इंग्लंडच्या व्यवसाय आणि उच्च शिक्षण संस्थांचे अनुभव प्रकाशित केले आहेत.
व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक पोषक वातावरणाच्या बाबतीत महाराष्ट्राला यात सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्राला ५ पैकी ३.३३ गुण मिळाले. त्यानंतर पुढे अनुक्रमे गुजरात, चंडीगड, हरियाना, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशी क्रमवारी आहे. गुंतवणूकदारांना व्यवसायासाठी अनुकूल वातावरणनिर्मितीच्या बाबतीत महाराष्ट्राने सर्वच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मागे टाकल्याचे अहवालात म्हटले आहे.
यूके इंडिया बिझनेस कौन्सिल ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था असून तिची स्थापना सन २००७ मध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातील व्यापार आणि व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी ही संस्था दोन्ही देशांतील सरकार आणि व्यावसायिकांशी धोरणनिश्चिती, सुविधा, नेटवर्क, अभ्यास या क्षेत्रात काम करते. या अहवालासाठी त्यांनी या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील सहाशे लहानमोठे उद्योग आणि उच्चशिक्षण संस्थांचे सर्वेक्षण केले. ब्रिटनच्या उद्योगांना भारतात येताना आणि काम करताना येणाऱ्या आव्हानांची चर्चा यात आहे. तसेच त्यांच्यासाठी आवश्यक सुधारणांचे प्राधान्यक्रम आणि भारताच्या व्यावसायिक वातावरणातील विविध पैलूंचे मानांकन यात नोंदवले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कुशल नेतृत्वाखाली उद्योगविकासासाठी विविध विभागांनी एकत्रितपणे केलेल्या सहकार्याचे हे उत्तम उदाहरण आहे. विविध उद्योगांना परवानग्या देण्यासाठी महाराष्ट्र लवकरच एक खिडकी व्यवस्थेसाठी कायदा तयार करणार आहे.
- डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, उद्योग विभाग