
भीमसैनिकांनो! इथे आवर्जून भेट द्या : जाणून घ्या बाबासाहेबांच्या पाउलखुला
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दाखल झाले आहेत. मुंबईत हे अनुयायी पुढील ३ ते ४ दिवस मुक्कामाला असतात. अनेक जण चैत्यभूमीचे दर्शन घेऊन माघारी फिरतात. बाबासाहेबांच्या कार्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक वास्तू आणि गोष्टी मुंबईत आहेत; मात्र त्यांची पुरेशी माहिती नसल्याने भीमसैनिकांना त्यांचे दर्शन घेता येत नाही.
समाधी स्थळ
डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्यावर दादर चौपाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथे चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले. याचे दर्शन घेतल्यानंतर अनुयायींना तिथेच लागून असलेल्या बाबासाहेबांचे पुत्र यशवंत आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शनदेखील घेता येऊ शकते.
जागतिक स्मारक
चैत्यभूमीपासून काही अंतरावरच केंद्र सरकार इंदू मिलच्या जागी बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारत आहे. सध्या याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी तीव्र आंदोलन छेडून स्मारकाचा मार्ग मोकळा केला. येथे छोटे विहार उभारण्यात आले असून त्यात भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या आहेत. उत्सुकता असणारे अनुयायी इंदू मिलला भेट देऊन त्याची पाहणी करू शकतात.
राजगृह
दादरमधीलच हिंदू कॉलनीमध्ये बाबासाहेबांचे राहते घर राजगृह आहे. याच घरात त्यांचे नातू वास्तव्यास आहेत. हे घर बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बांधले होते. या घरात २५ हजाराहून अधिक पुस्तके आहेत. शिवाय बाबासाहेबांच्या वापरातील अनेक वस्तू येथे बघायला मिळतात. महापारिनिर्वाणदिनी अनुयायींना दर्शन घेता यावे यासाठी राजगृहात प्रवेश दिला जातो.
परळमधील बीआयटी चाळ
परळ भागात जुन्या बीआयटी चाळी आहेत. या बीआयटी चाळ क्रमांक १, खोली क्रमांक ५० व ५१ मध्ये बाबासाहेबांचे वास्तव्य होते. बाबासाहेब आणि त्यांचे कुटुंबीय राहत असलेल्या चाळींमधील दोन खोल्यांना स्मारकाचा दर्जा महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आला. या बीआयटी चाळी आणि बाबासाहेबांच्या खोल्याही भीम अनुयायींना पाहता येतील.
सिद्धार्थ महाविद्यालय
फोर्ट येथील हुतात्मा चौकात बाबासाहेबांनी १९४६ मध्ये बांधलेले सिद्धार्थ महाविद्यालय आहे. मुंबईतील नामवंत माहाविद्यालयांमध्ये या विद्यालयाची गणना होते. समाजातील अनेक दिग्गज या महाविद्यालयात घडले आहेत.
बाबासाहेबांची प्रेस
बाबासाहेबांनी वकिली केलेले फोर्टमधील मुंबई उच्च न्यायालयालादेखील भेट देता येऊ शकते. यासह वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज, तेथील वसतिगृह तसेच बाबाबासाहेबांची प्रिंटिंग प्रेसदेखील पाहता येऊ शकते. सोबतच मंत्रालयासमोर बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे. बाबासाहेबांसारखा हुबेहूब असणारा पुतळा म्हणून या पुतळ्याची ख्याती आहे. त्याचे दर्शनदेखील घेता येईल.
सर्किट मोफत सहलीचा लाभ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी, पर्यटन संचालनालयाद्वारे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’ आयोजित करण्यात आली आहे. ३ डिसेंबरपासून ही सहल सुरू झाली असून ४, ७ आणि ८ डिसेंबरपर्यंत विनामूल्य सुरू राहणार आहे. सहलीसाठी दररोज ४ बसेस धावत आहेत.
लोकांना फर्स्ट कम फर्स्ट आधारावर घेतले जाते. या टूरमध्ये सहभागी होण्यासाठी ते ऑनलार्इन किंवा ऑफलार्इन नोंदणी करू शकतात. मुंबईत ऑनलार्इन नोंदणीसाठी https://docs.google.com वर; तर ऑफलार्इन नावनोंदणीसाठी ७७३८३७५८१२ विक्रम किंवा रसिका ७७३८३७५८१४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.