
मास्टर लिस्टसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पुनर्रचित इमारतीमध्ये कायमस्वरूपी घर देण्यात न आलेल्या आणि संक्रमण शिबिरात वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना मास्टर लिस्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार संक्रमण शिबिरात वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
मूळ उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होऊ शकत नसल्याने संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून मास्टर लिस्ट जाहीर करण्यात येते. मंडळाकडून हक्काचे घर मिळेल, या आशेवर हे रहिवासी गेली अनेक दशके संक्रमण शिबिरांमध्ये राहत आहेत. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला मिळणारी घरे मास्टर लिस्टच्या माध्यमातून देण्यात येतात; मात्र यामध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास येताच गृहनिर्माण विभागाने मास्टर लिस्टला स्थगिती दिली होती. मास्टर लिस्टवर असलेली स्थगिती उठविण्याची मागणी होऊ लागल्याने गृहनिर्माण विभागाने यावरील स्थगिती उठवली आहे.
म्हाडा मंडळाने त्यानुसार मूळ भाडेकरू आणि त्यांच्या वारसदारांकडून २४ फेब्रुवारीला अर्ज मागविले होते. यानंतर मंडळाने ४ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली होती. अर्जदारांच्या आग्रहाखातर मंडळाने पुन्हा २० जूनला रात्री १० वाजेपर्यंत अर्ज भरण्यास मुदत दिली होती. यानंतर पुन्हा मंडळाने अर्जदारांना ११ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे.