मुंबईत हवेचा स्तर अत्यंत ‘वाईट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत हवेचा स्तर अत्यंत ‘वाईट’
मुंबईत हवेचा स्तर अत्यंत ‘वाईट’

मुंबईत हवेचा स्तर अत्यंत ‘वाईट’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : ऐन हिवाळ्यात मुंबईत वाढलेला उकाडा, त्यात हवेचा घसरलेला स्तर अद्याप सुधारलेला नसल्याने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात आहे. त्यातच गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील हवेचा स्तर खालावला असून, आज हा स्तर २९३ एक्यूआय म्हणजेच ‘वाईट’ श्रेणीत नोंदवला गेला. त्यातही कुलाबा, मालाड, माझगाव, बीकेसी, अंधेरी भागातील हवेची गुणवत्ता ‘अतिशय वाईट’ नोंदली गेली. वातावरणात दिवसभर धुके आणि धूर दाटल्याने सर्दी, खोकला, घसा खवखवण्याचे त्रासही नागरिकांना जाणवू लागले आहेत.

‘सफर’ संस्थेच्या माहितीनुसार माझगाव परिसरातील हवेचा स्तर सर्वाधिक खराब असून, येथे ३८१ एक्यूआयची नोंद झाली आहे. त्याखालोखाल मालाड ३२३, कुलाबा ३०९, बीकेसी ३०९ आणि अंधेरी ३०३ एक्यूआय नोंद झाला. हे सर्व परिसर ‘रेड झोन’ आहेत. फक्त वरळी (१९०) आणि बोरिवली (१७३) आदी ठिकाणी ‘मध्यम’ हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. विशेष म्हणजे एकाही भागात समाधानकारक किंवा उत्तम हवेचा स्तर नोंदवला गेला नाही.

मुंबईत प्रदूषणासह धुळीचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे अनेक भागांत धूसर वातावरण आहे. धुक्यामुळे काही अंतरावरील इमारतीदेखील नजरेस पडत नाहीत. दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे यात भर पडल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत थंडीची संथ लाट आल्यामुळे गारवा जाणवत होता. या गारव्यासह प्रदूषणाची पातळीही वाढली होती. थंडीची लाट ओसरली असली तरी प्रदूषणाची पातळी काही कमी झालेली नाही.

सध्या हवेमध्ये धुळीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. यामुळे सर्दी, खोकला आणि घसा बसण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी हे वातावरण अगदी त्रासदायक ठरू शकते. श्वसनाचे विकार खास करून दम्याचा त्रास असणाऱ्यांनी सूर्योदयापूर्वी जॉगिंगसाठी बाहेर पडू नये.
- डॉ. जलील पारकर, श्वसन विकारतज्ज्ञ
......
परिसर एक्यूआय स्तर
माझगाव ३८१ अतिशय वाईट
मालाड ३२३ अतिशय वाईट
कुलाबा ३०९ अतिशय वाईट
बीकेसी ३०९ अतिशय वाईट
अंधेरी ३०३ अतिशय वाईट
भांडुप २८० वाईट
चेंबूर २६६ वाईट