पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होणार
पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होणार

पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा होणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : राज्यात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आदेश जारी केले आहेत. आतापर्यंत सुरू असलेल्या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये बदल होऊन हे अभ्यासक्रम चार वर्षांचे होणार आहेत. त्यासाठी गुणदान पद्धत जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठे, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक तसेच कौशल्य शिक्षण संस्थांना राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क राबवणे बंधनकारक असून त्याचे आदेश विभागाने जारी केले आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी १६ ऑक्टोबर २०२० च्या शासन निर्णयानुसार डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट स्थापन करण्यात आला होता. या गटाने ३० जून २०२१ रोजी आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर २७ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील मान्यतेनुसार डॉ. माशेलकर समितीने शिफारस केल्याप्रमाणे ४ वर्षांच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर करण्याची योजना व त्याबाबतचा आराखडा तयार करणे, एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करणे, सामान्य अध्यापनशास्त्राऐवजी विधायक अध्यापनशास्त्राचा वापर करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिकृत शिक्षणाचा आराखडा तयार करण्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला असून त्यातील शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची सन २०२३-२४ पासून प्रभावी व एकसमान अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व समूह विद्यापीठे आणि सर्व शैक्षणिक संस्थांसाठी निर्देश जारी करण्यात आली आहेत.
-----
गुणदान पद्धती...
प्रथम वर्ष (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) - किमान ४० क्रेडिट
द्वितीय वर्ष (डिप्लोमा) - किमान ८० क्रेडिट
तृतीय वर्ष (बॅचलर) - किमान १२० क्रेडिट
चार वर्षे (संशोधनासह बॅचलर) - किमान १६० क्रेडिट

-