वांद्र्यात आज ‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांद्र्यात आज ‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’
वांद्र्यात आज ‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’

वांद्र्यात आज ‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार ‘ग्रंथोत्सव २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्‍घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्या (ता. १०) सकाळी ११ वाजता होणार आहे. हा ग्रंथोत्सव वांद्रे पूर्वेतील शासकीय वसाहत, चेतना कॉलेजजवळील कम्युनिटी हॉल येथे होणार आहे.

जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांच्या उपस्थितीत सकाळी ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार ॲड. अनिल परब, ॲड. आशीष शेलार, झिशान सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहेत.

दुपारी ‘आनंदयात्रा’ या विषयावर प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर दीपाली केळकर यांचा हास्य संजीवनी हा कार्यक्रम होईल. तसेच उद्योजकता आणि स्टार्टअप विकास या विषयावर प्रा. एस. आर. कस्तुरे यांचे व्याख्यान होईल. महेश केळुसकर यांचे २१ भारतीय भाषांतील अनुवादित कवितांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ५ ते ६.३० वाघूर दिवाळी अंकाचे संपादक नामदेव कोळी, संतोष शेळके, अविनाश सावंत यांचे कविसंमेलन होणार आहे. या कार्यक्रमास ग्रंथप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले आहे.

‘आर्थिक साक्षरता’ विषयावर मुलाखत
११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत मुलांसाठी कथाकथन स्पर्धा होणार आहे. त्यानंतर श्याम जोशी यांचे ‘मराठी पुस्तक आणि वाचन संस्कृती’ या विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे. ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ या विषयावर गौरव सोमवंशी यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर ‘माझा साहित्यप्रवास’ या विषयावर डॉ. संगीता बर्वे यांचे व्याख्यान, प्रवीण दवणे यांचे ‘वाचनाची आनंदयात्रा’ यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४ ते ५ या वेळेत ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर प्रफुल्ल वानखेडे यांची सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक राहुल गडपाले हे मुलाखत घेणार आहेत.