बकाल वस्त्या लपवण्यासाठी धावाधाव : जी २० बैठकीपूर्वी पालिकेची तयारी; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बकाल वस्त्या लपवण्यासाठी धावाधाव : जी २० बैठकीपूर्वी पालिकेची तयारी;
बकाल वस्त्या लपवण्यासाठी धावाधाव : जी २० बैठकीपूर्वी पालिकेची तयारी;

बकाल वस्त्या लपवण्यासाठी धावाधाव : जी २० बैठकीपूर्वी पालिकेची तयारी;

sakal_logo
By

बकाल वस्त्या लपवण्यासाठी धावाधाव
‘जी २०’ बैठकीपूर्वी पालिकेची ‘मलमपट्टी’

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेच्या बैठकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जगभरातील परदेशी पाहुणे बैठकीला हजेरी लावणार आहेत. मुंबई महापालिकाही बैठकीच्या जय्यत तयारीला लागली असून पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या बाजूच्या झोपडपट्ट्या लपवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. झोपडपट्ट्या किंवा त्याबाहेर साचलेली घाण दिसू नये यासाठी रस्त्याच्या कडेला फलक आणि बॅरिकेड्स लावून ‘मलमपट्टी’ केली जात आहे.
माहीम कॉजवे भागात मोठ्या प्रमाणात ‘जी २०’चे छापील फलक लावण्यात आले आहेत. तीन दिवसांपासून अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या पथकाकडून पाहणी झाल्यानंतर त्यांनी फलक आणि बॅरिकेड्स लावले. शोभिवंत झाडांची रोपे आणून लावण्यास सुरुवात केली, अशी माहिती कुरेशी नगरमधील रिक्षाचालक अब्बास कुरेशी यांनी दिली. कदाचित ते परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना आमच्या झोपडपट्ट्या दाखवू इच्छित नसतील असेही ते म्हणाले.
पालिकेचे उपआयुक्त रणजित ढाकणे ‘जी २०’ शिखर परिषदेसाठी झोन ​​३ आणि सुशोभीकरण मोहिमेचे प्रभारी आहेत. परिषदेसाठी आमची तयारी जोरात सुरू आहे. आम्ही वांद्रे ते बोरिवली आणि इतर ठिकाणी रस्त्याचे सुशोभीकरण जवळजवळ पूर्ण केले आहे असे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी बॅरिकेड्स आणि फलक लावण्याची गरज होती, अशा ठिकाणी गरजेनुसार आम्ही ते लावले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेसाठी सुशोभीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून विकास करण्यात येत आहे.
वांद्र्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी सर्व प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की मुंबई विविधतेसाठी ओळखली जाते. मग सत्य परिस्थिती का लपवायची? जे वास्तव आहे ते लपवण्यात काहीही अर्थ नाही. सुशोभीकरण नियमित व्हायला हवे असेही ते म्हणाले.
वाकोला पुलाखाली उभ्या असलेल्या अनेक कारमालकांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मी त्यांना सांगितले, की वाहने हटवली जाणार नाहीत. मी आंदोलनाचा इशारा दिल्याने पालिकेने आता पांढरे पडदे लावले आहेत, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले.
परदेशी पाहुणे आपल्याकडे आले की अशीच लपवाछपवी सुरू होते. झोपडपट्ट्या आणि गरिबी झाकण्याचा प्रयत्न होतो. असे करण्यापेक्षा वास्तव बदलण्यावर भर देणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते मन्सूर पटेल यांनी मांडले.

दुरुस्तीऐवजी डागडुजी!
‘जी २०’ प्रतिनिधी मुंबई पर्यटन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांना भेट देणार असल्याचे समजते. त्यासाठी पश्चिम द्रुतगती मार्गाच्या संपूर्ण भागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. रस्तेदुरुस्तीसाठी वनखात्याकडे निधीची पुरेशी तरतूद नसल्याने पालिकेने रस्त्यांची डागडुजी करण्याचा निर्णय घेतल्याचेही म्हटले जात आहे.

मिठी नदीही आडोशाला
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि सायन-वांद्रे रोड जंक्शनजवळील मिठी नदीलाही फलकांचा आडोसा तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून नदीची दुरवस्था झालेला भाग झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.