
आर्थिक साक्षरतेची चर्चा घराघरांत व्हायला हवी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : देशाच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पावर घराघरांत चर्चा होते; मात्र कुटुंबातील आर्थिक नियोजनावर आपण साधी चर्चा करत नाही आणि घरचे बजेटही ठरवत नाही. आर्थिक स्वातंत्र्यासंदर्भात घराघरांतून चर्चा सुरू व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन उद्योजक व ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी आज (ता. ११) केले.
मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे पूर्वमध्ये मुंबई उपनगर ग्रंथोत्सव सुरू आहे. त्यात ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी प्रफुल्ल वानखेडे यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत वानखेडे यांनी आयुष्यात आर्थिक साक्षरतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
पैशाची बचत करताना त्यातील काही पैसे शिक्षणासाठी, आनंदासाठी खर्च केले पाहिजेत. पैसा कमावले पाहिजे; मात्र माणुसकी सोडून चालणार नाही. ज्या मातीतून आलो, त्या समाजासाठीही काहीतरी देण्याची भावना आपल्यात असायला हवी, असेही वानखेडे म्हणाले.
स्वप्न मोठे पाहा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास मराठी माणूस का धजावत नाही, असा प्रश्न संपादक राहुल गडपाले यांनी विचारला. त्यावर वानखेडे म्हणाले की, मराठी कुटुंबांकडून स्वप्नेच संकुचित पाहिली जातात. मध्यमवर्गीय माणसाची स्वप्ने घर, गाडी, गावाला एखादे घर अथवा दुसरे घर, पत्नीचे दागदागिने, टूर किंवा देवदर्शन एवढ्यापर्यंत मर्यादित असतात. भारतरत्न अब्दुल कलाम यांनी सांगितल्यानुसार स्वप्न मोठी पाहायला हवीत. मी उद्योजक म्हणून स्वप्न पाहिले, त्यामध्ये जगातील प्रतिष्ठित व्यक्ती, ब्रँडसोबत काम करेल, असे होते. त्या स्वप्नानुसार मी जगलो, त्यामुळेच आज आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम करत आहे. त्यामुळे मोठी स्वप्ने बघितली, तरच आपण पुढे जाऊ शकतो.
गुंतवणुकीचे नवे मार्ग शोधा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी, त्याशिवाय आपल्या उत्पन्नात वाढ होणार नाही; मात्र पैसा गुंतवून वाट पाहायची तयारी असेल; तरच पैसा वाढू शकतो. शेअर मार्केटशिवाय दहा-बारा इतरही पर्याय आहेत; परंतु आपल्याकडे एफडीसारख्या कालबाह्य झालेल्या पर्यायावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे लोकांना गुंतवणुकीचे पर्याय कळत नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीसंदर्भात चांगले पर्याय निवडायला हवेत, असेही प्रफुल्ल वानखेडे म्हणाले.
पैसा डोक्यात नको
पैसा हाती आल्यानंतर त्याची वागणूक कशी असते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पैसा खिशात असेल, तोपर्यंत ठीक; मात्र तो डोक्यात गेला, तर सर्व काही संपते, असेही वानखेडे म्हणाले. आर्थिक साक्षरता कुठल्या वयात सुरू केली पाहिजे, असे विचारले असता ते म्हणाले की, आर्थिक साक्षरतेची सुरुवात ही पहिला पगार अथवा पहिली कमाई सुरू होईल, त्या दिवसापासून झाली पाहिजे. त्यात आर्थिक साक्षरतेपेक्षा आर्थिक स्वातंत्र्य कितव्या वर्षी मिळवता येईल, हे महत्त्वाचे असते. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच खरे आयुष्य सुरू होते.
अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरतेचा विषय
तरुणांना आर्थिक साक्षरतेबाबत काय वाटते, मराठी माणूस आर्थिक साक्षरतेपासून अजूनही दूर आहे, असे विचारले असता, ते म्हणाले की, आर्थिक साक्षरतेचा विषय माध्यमिक शाळेपासूनच शिकवायला हवा. मराठी कुटुंबांत व्यवहारज्ञान शिकवले जात नाही. केवळ विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि पदवीचे शिक्षण दिले जाते; मात्र त्यांना व्यवहारज्ञान नसल्याने त्यांचे खूप तोटे होतात. त्यामुळे माध्यमिक शाळेपासूनच आर्थिक साक्षरता आणि व्यवहारज्ञान शिकवले पाहिजे.