राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ
राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ

राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १४ : राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या वीजवापरात गेल्या आर्थिक वर्षातील मासिक सरासरी ३,८३३ दशलक्ष युनिटवरून वाढ होऊन ती ४,१०१ दशलक्ष युनिट इतकी झाली आहे. तसेच राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज (ता. १४) दिली.

उच्च दाब औद्योगिक ग्राहकांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण ३९ हजार ३९७ दशलक्ष युनिट; तर लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी ६ हजार ६०६ दशलक्ष युनिट वीज वापरली होती. एकूण औद्योगिक वीज वापर ४६,००३.२६ दशलक्ष युनिट इतका होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक औद्योगिक वीजवापर ३,८३३ दशलक्ष युनिट होता. २०२२ -२३ या चालू आर्थिक वर्षात राज्यातील औद्योगिक वीज वापरात वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात औद्योगिक ग्राहकांना ३२,८०८ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली असून हा वीजवापर मासिक सरासरी ४,१०१ दशलक्ष युनिट इतका आहे.

राज्यातील नवीन औद्योगिक जोडण्या घेणाऱ्या वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण उच्चदाब औद्योगिक वीज ग्राहक १४ हजार ८८५ होते. त्यांची संख्या या आर्थिक वर्षात वाढून नोव्हेंबरपर्यंत १५ हजार ७८ झाली आहे. लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही ३,८१,२७२ वरून वाढून ३,८३,२७२ इतकी झाली आहे. नोव्हेंबरअखेर राज्यात एकूण औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या ३ ,९८,३५० इतकी झाली आहे.

महावितरणकडून विविध सवलती
राज्यामध्ये औद्योगिक वीज ग्राहकांना वीजदरात विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. विद्युत आकारावर १५ टक्के लोड फॅक्टर सवलत, ठोक वीज वापर सूट, लवकर वीजबिल भरले तर सूट, अतिउच्चदाब ग्राहकांना वहन आकारातील बचत, विजेचा वापर रात्री दहानंतर केल्यास दरात सवलत अशा सवलती दिल्या जातात. अशा सर्व सवलतींचा लाभ घेतला तर उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना सरासरी ५ रुपये प्रतियुनिट दराने वीज आकारणी केली जाते. या खेरीज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील तसेच ‘डी’ आणि ‘डी प्लस’ औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीजदरात सवलत दिली जाते.