४६ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४६ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत
४६ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत

४६ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक योजना आणि त्यांच्या लाभासाठी आवश्यक असलेले ‘आधार कार्ड’ अद्ययावत करण्यात मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाने राज्यात आघाडी घेतली आहे. महिनाभरात सुमारे ४६ लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत झाली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत मुंबई डीवायडी, मुंबई बीएमसीसह ठाणे, रायगड, पालघर आदी चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र येते. या कार्यक्षेत्रातील एकूण ४५ लाख ८१ हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४४ लाख १० हजार ६४ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शाळा आणि संबंधित योजनांच्या अंमलबजावणीसाठी अद्ययावत करण्यात आले आहे. त्याची एकूण टक्केवारी ९६.२५ टक्के इतकी असून, केवळ विविध तांत्रिक आणि इतर कारणांमुळे एक लाख ७१ हजार ६०४ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत झाले नाहीत. ही प्रक्रियाही येत्या काही दिवसांत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.

पालघरची आघाडी
मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या जिल्ह्यांमधून पालघरने सर्वाधिक वेगाने आधार कार्ड अद्ययावत करण्यात आघाडी घेतली. पालघर जिल्ह्याने यात प्रथम स्थान पटकावले. त्यानंतर दुसऱ्या स्थानी मुंबई-II, रायगड तिसऱ्या, ठाणे चौथ्या आणि मुंबई बीएमसी पाचव्या स्थानावर आहे.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत आधार कार्ड अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू होती. मागील काही दिवसांत मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून योग्य नियोजन करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून त्यासाठी सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संघभावनेने काम केल्याने मागील महिन्याभरात ही नोंदणी पूर्ण झाली आहे.
- संदीप संगवे, शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग

जिल्हा एकूण विद्यार्थी आधार अद्ययावत एकूण टक्केवारी
मुंबई-II १०७०३९४ १०५६८८८ ९८.७४
मुंबई बीएमसी ६८४४०७ ६३६२६८ ९२.८७
ठाणे १५८९६५४ १५१०६१७ ९५.०३
रायगड ५१४५३० ५०२४७७ ९७.६६
पालघर ७२२६८३ ७०३८१४ ९७.३९
एकूण ४५८१६६८ ४४१००६४ ९६.२५