
जीर्ण इमारतीवर कारवाईचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : माझगाव येथील ब्रिटिशकालीन प्रिन्स अली खान रुग्णालयाची इमारत जीर्ण व धोकादायक झाली आहे, या आयआयटी मुंबईच्या अहवालावर कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.
आयआयटी मुंबईला स्ट्रक्चरल ऑडिट करून रुग्णालयाची इमारत जीर्ण अथवा धोकादायक झाली आहे की नाही, हे तपासण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार न्या. नितीन जामदार आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने आयआयटीकडून मिळालेल्या अहवालावर, कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेवर सोपवत आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले आणि याचिका निकाली काढली. इमारतीची धोकादायक अवस्था पाहता कर्मचाऱ्यांची बाजू ऐकली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत कर्मचारी आणि रुग्णालयाशी संबंधित अन्य याचिकाकर्त्यांना त्यांच्या हक्कांबाबत कायदेशीर पर्यायांचा मार्ग स्वीकारण्याची मुभा आहे, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. माझगावमधील प्रिन्स अली खान हे खासगी रुग्णालय १९४५ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार इमारत जीर्ण झाल्याचे आढळून आले आहे.