
दीड महिन्यांत २८ हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून जोडणीची प्रतीक्षा करावी लागत होती. शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी महावितरणने उपक्रम सुरू केला असून केवळ दीड महिन्यात २७,९८० नवीन जोडणी दिली आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार महावितरणने विशेष नियोजन करून मोहीम सुरू केली. महावितरणने ३१ मार्च २०२२ अखेर कृषी पंपांसाठी वीज कनेक्शन मिळण्यासाठी प्रलंबित १,८०,१०६ अर्जांपैकी ८२,५८४ कनेक्शन एप्रिल २०२२ ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत देण्यात आली आहेत. यापैकी २७,९८० जोडण्या नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरचे पंधरा दिवस या ४५ दिवसांत करण्यात आल्या आहेत.
महावितरण चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे ३१ मार्च २०२३ पर्यंत आणखी एक लाख कृषी पंप जोडण्या देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज नव्याने दाखल होत आहेत, पण त्याचवेळी महावितरण शेतकऱ्यांना प्राधान्याने नवीन जोडणी देत आहे. परिणामी राज्यातील कृषी पंपांसाठी वीज जोडणी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे.