
राज्यात चार रिसायकलिंग पार्क
मुंबई, ता. १६ ः पर्यावरणाची जपणूक करण्याच्या उद्दिष्ठाचा एक भाग म्हणून टाकाऊ वस्तुंचा फेरवापर होण्यासाठी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर व रत्नागिरी या शहरांमध्ये रिसीयकलिंग पार्क तयार होणार आहेत. येथे जवळपास सर्वच टाकाऊ वस्तुंचा पुर्नवापर होईल. गुरुवार रोजी (ता.१५) येथील एका उच्चस्तरीय बैठकीत उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. प्लास्टिक, टायर, धातू आदी सर्वच टाकाऊ बाबींपासून पुन्हा त्याच वस्तू तयार करण्याला सर्क्युलर इकॉनॉमी पार्क म्हटले जाते. त्यानुसार ही पार्क तयार केली जातील.
याबाबत अर्नस्ट अँड यंगला प्रकल्प अहवाल देण्यास सांगण्यात आले असून या संदर्भातील धोरणाला शंभर दिवसात मंजुरी दिली जाईल, असेही कांबळे यांनी या वेळी सांगितले. या पार्कमुळे लाखो लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतील अशी अपेक्षा आहे. साधारण वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण होतील, अशीही शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या या प्रकल्पाचा नॉलेज पार्टनर म्हणून मटेरियल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एमआरएआय)ला नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे परिसराचा विकास होईल, अशी अपेक्षा एमआरएआयचे अध्यक्ष संजय मेहता यांनी व्यक्त केली. या संघटनेचे देशात बाराशे सदस्य आहेत.