
गोवरमुळे मुंबईत १७ वा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : शहरात गोवरमुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ होत असून गोवंडी येथील पाच महिन्यांचे बाळ शुक्रवारी (ता. १५) दगावले आहे. बाळाला घशाचा संसर्ग व गोवरची लागण झाली होती. ते लसीकरणासाठी पात्र नव्हते, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गोवरमुळे मुंबईत आतापर्यंत १७ मुलांचा मृत्यू झाले असून तीन मुले मुंबईबाहेरील आहेत.
मुंबईत गोवरचा झपाट्याने प्रसार होत आहे. शहरातील भायखळा, वरळी, वडाळा, धारावी; तर पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व, मालाड उत्तर, पूर्व उपनगरातील गोवंडी, चेंबूर, कुर्ला, भांडुप या भागात गोवरचा उद्रेक झाला आहे. मुंबईत दिवसभरात गोवरचे २८ संशयित रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ५,०७७ वर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात तीन नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ४८५ वर पोहोचली आहे. तीन मुले व्हेंटिलेटरवर आहेत. कस्तुरबा, गोवंडी शिवाजीनगर प्रसूती गृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल, कुर्ला भाभा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली आदी रुग्णालयांत गोवरबाधित रुग्णांच्या उपचारासाठी विशेष खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
मुंबई शहरातील गोवरबाधितांची आकडेवारी
शुक्रवारी संशयित रुग्णांची नोंद २८
दिवसभरात रुग्णांना डिस्चार्ज २६
उपचारासाठी दाखल रुग्ण ३७
एकूण घरांचे सर्वेक्षण ८७,११,०३३