
स्वदेशी ‘गगनयान’मधून मिशन अंतराळ लवकरच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : भारतीय बनावटीच्या गगनयान यानासाठी ‘इस्रो’च्या माध्यमातून सुरू केलेल्या संशोधनाचे काम प्रगतिपथावर आहे. या मिशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच मानवासह अंतराळ मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती इस्रोच्या ‘लिक्विड प्रपोलेशन सिस्टिम सेंटर’चे (एलपीएससी) संचालक व्ही. नारायण यांनी आज मुंबईत दिली. तसेच पुढील वर्षी ‘चंद्रयान’च्या एका नव्या टप्प्याचे नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयआयटी मुंबईत आजपासून सुरू झालेल्या ‘टेकफेस्ट’ महोत्सवात व्ही. नारायण ‘अंतराळ तंत्रज्ञान आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टममधील प्रगती’ या विषयावर मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्ही. नारायण म्हणाले, की गगनयान भारताचे अंतराळात पाठवणारे पहिले ‘मिशन यान’ आहे. ही मोहीम खूप आव्हानात्मक आहे. यासाठी किती वेळ जाईल सांगता येत नाही; मात्र एकूण संशोधन आणि त्यावरील कामकाज खूप वेगाने सुरू असल्याने लवकरच भारतीय बनावटीच्या गगनयानमधून ‘मिशन आंतराळ’ हे अभियान होईल, असेही त्यांनी सांगितले.
गगनयान मोहिमेत मानव अंतराळात जाणार आहे. त्यामुळे उड्डाणासाठी देशासमोर बरीच आव्हाने आहेत. ती आव्हाने शोधून त्यावर काम सुरू करण्यात आले आहे. यानाचे उड्डाण झाल्यानंतर आपत्कालीन यंत्रणेवरही काम सुरू आहे. हे यान पृथ्वीच्या कक्षेत आणि एका विशिष्ट अंतरावरून परतताना नादुरुस्त होण्याचा धोका मोठा असतो, ते होऊ नये यासाठी संशोधन सुरू असल्याची माहिती व्ही. नारायण यांनी दिली.
ध्वनीपेक्षा तिप्पट वेगाने ब्राह्मोसचा हल्ला
१) भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे ‘ब्राह्मोस’ हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. ध्वनीपेक्षा जवळपास तिप्पट वेगाने ते हल्ला करू शकते. सुमारे ३०० किलोमीटरवरील लक्ष्य ‘ब्राह्मोस’ अचूकपणे भेदू शकते, अशी माहिती ‘ब्राह्मोस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल राणे यांनी दिली.
२) ‘ब्राह्मोस’कडून ७०० किलोमीटरवरून जमिनीवरील लक्ष्य अचूकपणे भेदण्याची चाचणी पूर्ण झाली असून, हे लक्ष्य भेदणारे ब्राह्मोस लवकरच येणार आहे. ‘ब्राह्मोस’ची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य आणि उत्तर आशियामध्येही या क्षेपणास्त्राची मागणी असल्याचे राणे म्हणाले.
५० हजार विद्यार्थ्यांच्या भेटी
मुंबईतील आयआयटी ‘टेकफेस्ट’मध्ये प्रामुख्याने तंत्रज्ञान आणि त्यांचे विविध आविष्कार यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यासोबत पर्यावरण, सांडपाण्याचा पुनर्वापर, बायोडिझेल, इलेक्ट्रिक बॅटरी आणि पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आदी विषयांवर लावलेले स्टॉल लक्ष वेधत आहेत. पहिल्या दिवशी सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांनी ‘टेकफेस्ट’च्या विविध कार्यक्रमांना भेटी दिल्याचे सांगण्यात आले.