‘बार कौन्सिल’ची शुल्क वसुलीसाठी मनमानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बार कौन्सिल’ची शुल्क वसुलीसाठी मनमानी
‘बार कौन्सिल’ची शुल्क वसुलीसाठी मनमानी

‘बार कौन्सिल’ची शुल्क वसुलीसाठी मनमानी

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षांसाठी कोणत्याही सुविधा न देता विद्यार्थ्यांकडून मनमानीपणे शुल्क आकारले जात आहे. यात विशेष प्रवर्गासाठी अडीच हजार; तर सर्वसाधारण वर्गासाठी ३,२५० रुपये विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जाणार असल्याने त्याला राज्यभरातून कडाडून विरोध केला जात आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने परीक्षेच्या शुल्कासंदर्भात मनमानी करू नये, असा इशारा महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते अॅड. धनंजय जुन्नरकर यांनी दिला आहे.

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षांचे नुकतेच वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थी ज्या जिल्ह्यात राहतात, तेथे त्यांना परीक्षा केंद्र मिळालेले नसल्याने अनेकांना त्याचा त्रास सोसावा लागणार आहे. राज्यात या परीक्षेसाठी केवळ ५० परीक्षा केंद्रे ठेवण्यात आली असून त्यामध्ये प्रमुख शहरांमध्येच त्यांची सर्वाधिक संख्या असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा खर्च करून परीक्षेसाठी जावे लागणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र बार कौन्सिलकडून विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यावर त्यासाठी दिल्या जाणाऱ्या सनदीसाठी १५ हजार आणि सदस्यता म्हणून १५० रुपये अगोदरच वसूल केले जातात. परीक्षेच्या काळात यापूर्वी बेअर अॅक्ट हे पुस्तक घेऊन जायची परवानगी होती. ते आता केवळ इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. ते पुस्तक नोट्‍सशिवाय हवे, असे नोटिफिकेशन काढल्याने ते विकत घ्यायला विद्यार्थ्यांना दोन हजार ते अडीच हजार रुपये खर्च करावे लागतात. राज्यात ४० टक्के विद्यार्थी मराठी माध्यमातून परीक्षा देतात. त्यांना भाषांतर करून किंवा इंग्रजी भाषेतील पुस्तके विकत घ्यावी लागतात. या मराठी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र बार कौन्सिलने पुस्तके द्यावीत, अशी मागणी जुन्नरकर यांनी केली आहे.