नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी मोहीम
नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी मोहीम

नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी मोहीम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे नादुरुस्त वितरण रोहित्र तत्काळ बदलण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त ७,१३८ पैकी ६,५१६ रोहित्रे केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये केवळ ६२२ नादुरुस्त रोहित्रे बदलणे शिल्लक असून ती तत्काळ बदलण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी थकीत व चालू वीजबिलांपोटी खंडित करू नये, तसेच सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नादुरुस्त वितरण रोहित्र तत्काळ बदलून द्यावे, असे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी महावितरणकडून सुरू आहे. यामध्ये राज्यभरात २९ नोव्हेंबरपूर्वी नादुरुस्त असलेले ६,०९२ व त्यानंतर शनिवारपर्यंत (ता. १७) नादुरुस्त झालेली ६,५१६ असे एकूण १२,६०८ नादुरुस्त रोहित्रे महावितरणकडून युद्धपातळीवर बदलण्यात आली आहेत.

यापूर्वी विविध कारणांमुळे सुमारे तीन हजार ते साडेतीन हजार रोहित्रे दररोज बदलणे शिल्लक राहत होते. महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांना नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदलण्याची सूचना केली. नादुरुस्त किंवा जळालेल्या वितरण रोहित्रांची दुरुस्तीसाठी महावितरणने राज्यभरात १,९३४ कंत्राटदार एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ११,६३२ रोहित्रे दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली. नादुरुस्त रोहित्रे बदलण्यासाठी महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे ४,०१८ रोहित्रे सद्यस्थितीत अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहेत.


कृषिपंपांसाठी तीन फेजची एकूण रोहित्रे
७ लाख ५४ हजार

शेतकऱ्यांच्या रोहित्र दुरुस्त टोल फ्री क्रमांक
१८००२१२३४३५
१८००२३३३४३५