
दोन इमारतींतील जागेबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण
मुंबई, ता. १९ : वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रस्तावित प्रकल्पात दोन इमारतींमध्ये हवा खेळती राहण्यासाठी जागा ठेवलेली नाही, असा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
वास्तुरचनाकार शिरीष पटेल आणि सुलक्षणा महाजन यांनी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्याबाबत न्यायालयात याचिका केली आहे. राज्य सरकारने या नियोजित आराखड्यात हवा खेळती राहण्यासाठी दोन इमारतींमध्ये पुरेशी जागा ठेवण्यात आलेली नाही, आपत्कालीन प्रसंगात आवश्यक असलेली जागा ठेवण्यात आलेली नाही, असे याचिकेत म्हटले आहे. प्रभारी मुख्य न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठापुढे आज याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली. येथील एकूण अकरा इमारतींचे बांधकाम जवळजवळ झाल्यास सत्तर मजली इमारती विकता येतील, असा आरोप करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने याचिकेला विरोध करण्यात आला. ही याचिका रहिवाशांनी केलेली नाही, त्यामुळे ती नामंजूर करावी, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले.