कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी नव्याने जाहिराती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी नव्याने जाहिराती
कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी नव्याने जाहिराती

कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी नव्याने जाहिराती

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : कुलगुरूंची नियुक्ती ही विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१८ मध्ये जारी केलेल्या नियमावलीनुसारच केली जाणार आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आज (ता. १९) सुधारणा विधेयक मांडण्यात आले. त्यानुसार रामटेक येथील कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कायद्यात कुलगुरू नियुक्तीसाठी बदल केले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरू नियुक्तीसाठी मागील महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या जाहिराती रद्द करून त्या नव्याने त्यांच्या निकष आणि पात्रतेसाठी नव्या नियमावली जारी केल्या जाणार आहेत.

उच्च शिक्षण विभागाने महिन्याभरापूर्वी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीसाठी यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) जारी केलेल्या २०१८ च्या नियमावलीप्रमाणेच सर्व नियुक्ती करण्यासाठी अध्यादेश जारी केला होता. त्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सुधारणा विधेयक मांडण्यात आले. त्या सुधारणा विधेयकानुसार कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यशवंतराव चव्हाण विद्यापीठ कायद्यात आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा- २०१६ मध्ये बदल केले जाणार आहेत. त्या बदलानुसार ११ अकृषी विद्यापीठांमध्ये यूजीसीची नियमावली जारी केली जाणार आहे. त्यामुळे कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासोबतच पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी सुरू केलेली प्रक्रिया रद्द करून आता नव्याने करावी लागणार आहे.

असे असतील नवे बदल
२७ मे २००९ च्या राजपत्रानुसार कुलगुरूपदासाठी किमान १५ वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा, संशोधन आदी आवश्यक होते. कुलगुरू हे प्राध्यापक या वर्गातूनच येत होते. आता यूजीसीच्या नव्या नियमावलीनुसार कुलगुरूंच्या निवड आणि पात्रतेसाठी किमान १० वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा ग्राह्य धरली जाईल. शिवाय कोणत्याही नामांकित संस्थेचा प्रमुखही यासाठी पात्र ठरू शकतील. कुलगुरू शोध समिती जाहीर केल्यानंतर त्या कुलगुरू निवडीसाठी यूजीसीचा एक प्रतिनिधी हा त्यासाठीच्या शोध समितीत असेल.