
एससीईआरटीचे शिक्षकांना निपुण भारतसाठी प्रशिक्षण:
‘निपुण भारत’साठी एससीईआरटीचे शिक्षकांना प्रशिक्षण
विद्यार्थ्यांच्या वरच्या श्रेणीबाबत निकष लागू
मुंबई, ता. २१ : निपुण भारत अभियानांतर्गत राज्यातील दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील संपादणुकीचे मूल्यमापन कार्यक्रम राज्यात २२ डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. २०) मुख्याध्यापक आणि शिक्षकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) कडून खास प्रशिक्षण देण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांचे नीट आकलन झाल्याशिवाय शिक्षकांनी त्याला वरच्या श्रेणीसाठी अतिरिक्त मदत करू नये आणि त्यासाठी चुकीची माहिती भरू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील संपादणुकीचे मूल्यमापन कार्यक्रमअंतर्गत प्रथम भाषा, गणित, परिसर अभ्यास, तृतीय भाषा इंग्रजी इत्यादी विषयांचे मूल्यांकन करण्यात येईल. सदर मूल्यांकन मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड आणि सिंधी अशा दहा माध्यमांतून होणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना वरची श्रेणी मिळावी म्हणून शिक्षकांनी अतिरिक्त मदत करू नये. अतिरिक्त मदत केल्यास विद्यार्थ्याचे आकलन नेमकेपणाने समजणार नाही, असेही म्हटले आहे.
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षकांमार्फतच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता आणि विषयनिहाय आकलन किती झाले हे पडताळणे, शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सर्वेक्षण चाचणीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्रपणे मौखिक स्वरूपात, आवश्यकतेनुसार लेखी पद्धतीने सर्वेक्षण होईल. त्यासाठी मंगळवारी यू-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर सर्वेक्षणासाठी मूल्यांकन निकष निश्चित करण्यात आले आहेत.
शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरीत्या समोर बसवून निकोप वातावरणात सर्वेक्षणात सहभाग घ्यावयाचा असून विचारलेल्या प्रश्नाला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार प्रगत (३), प्रावीण्य (२), प्रगतशील (१) आणि प्रारंभिक (०) दरम्यानची श्रेणी त्याला दिली जाईल. सदर सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना लेखी प्रश्नपत्रिका देण्यात येणार नाही अथवा सामूहिकरीत्या प्रश्न विचारले जाणार नाहीत. सदर सर्वेक्षणाच्या कालावधीत वर्गात तणावमुक्त वातावरण राहण्याची काळजी घेण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.
असे करावे सर्वेक्षण
- सदर सर्वेक्षण शाळेच्याच वेळेत वर्ग, विद्यार्थिसंख्या आणि शिक्षकांच्या संख्येनुसार सुटीचा कालावधी विचारात घेऊन शाळास्तरावर नियोजन करून करावे.
- विद्यार्थिसंख्येनुसार सर्वेक्षणाचा कालावधी कमी किंवा जास्त होऊ शकेल आणि त्याची लवचिकता शाळा स्तरावर राहील.
- www.maa.ac.in संकेतस्थळाद्वारे सर्वेक्षणासाठीची साधने उपलब्ध करून दिली जातील. परिषदेमार्फत नव्याने सुरुवात केलेल्या टेलिग्राम चॅनेलवरूनही सर्वेक्षण साधने व शिक्षक सूचनापत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत.