अनिल देशमुखांचा मुक्काम तूर्तास तुरुंगातच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल देशमुखांचा मुक्काम तूर्तास तुरुंगातच
अनिल देशमुखांचा मुक्काम तूर्तास तुरुंगातच

अनिल देशमुखांचा मुक्काम तूर्तास तुरुंगातच

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : खंडणीवसुली प्रकरणात जामीन मिळूनही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार आहे. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर मंगळवारपर्यंत (ता. २७) सुनावणी घेण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच तोपर्यंत देशमुख यांच्या जामिनावर स्थगितीही कायम राहणार आहे.

देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे; तर जामिनाला सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे; मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी सुरू असून सुटीकालीन न्यायालय अद्याप बसलेले नाही. त्यामुळे याचिकेवर सुनावणी झाली नाही. म्हणून ३ जानेवारीपर्यंत जामिनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्या. मकरंद कर्णिक यांनी हा स्थगिती अवधी २७ डिसेंबरपर्यंत मंजूर केला आहे. तसेच तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी दाद मागण्याचे निर्देशही दिले आहेत.

देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी याचिकेला विरोध केला. या प्रकरणात रीतसर जामीन मंजूर झाला असूनही देशमुख यांना बाहेर येऊ दिले जात नाही. यामुळे त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्य अधिकारांचा भंग होत आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. देशमुख यांना तातडीने उपचारांची गरज आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेदेखील त्यांना जामीन मंजूर केला आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

पलांडेंविरोधात पुरावे नाहीत!
देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे यांच्यावरील मनी लॉण्डरिंग आरोपात पुरेसे पुरावे आढळत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. पलांडे यांना न्यायालयाने मंगळवारी (ता. २०) जामीन मंजूर केला आहे. पलांडे यांना जून २०२० मध्ये अटक केली होती. देशमुख यांना पलांडेंमार्फत वाझेकडून खंडणीची रक्कम मिळत होती, असा आरोप ईडीने केला आहे. पलांडे यांना सीबीआय प्रकरणातदेखील अटक झाली आहे.