अनुष्का शर्माकडून याचिका मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुष्का शर्माकडून याचिका मागे
अनुष्का शर्माकडून याचिका मागे

अनुष्का शर्माकडून याचिका मागे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : विक्री कर विभागाने २०१२-१३ आणि २०१३-१४ ची कर थकबाकी वसूल करण्यासाठी बजावलेल्या नोटिशीविरोधात अभिनेत्री अनुष्का शर्मा स्वतः याचिका का करत नाही, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला. न्यायालयाने फटकारल्यानंतर अनुष्काने स्वतःच्या कर सल्लागारामार्फत केलेली याचिका मागे घेतली. तसेच स्वतः अनुष्काला याचिका दाखल करण्याची परवानगीही दिली आहे.

अनुष्का शर्माने पुरस्कार सोहळ्यात केलेले सादरीकरण आणि निवेदन यामुळे व्यावसायिक रीतीने उत्पादनांची जाहिरातबाजी झाली आहे, असा ठपका सेल्स विक्री विभागाने ठेवत तिला विक्री कर विभागाने नोटीस बजावली आहे. यासंबंधी २०१२-१३ मध्ये १.२ कोटी रुपये; तर २०१३-१४ मध्ये १.०६ कोटी रुपये कर थकबाकी दाखवली आहे. ही थकबाकी वसूल करण्याची नोटीस विक्री कर उपायुक्तांनी पाठवली. या नोटिशीला अनुष्काने न्यायालयात आव्हान दिले; मात्र स्वतः याचिका दाखल न करता तिच्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली. न्या. नितीन जामदार आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.

न्यायालयाने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. ‘एखाद्या व्यक्तीने कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली, असे आतापर्यंत कधी घडले नाही. याचिकादार शर्मा स्वतः का याचिका करू शकत नाही,’ असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. तसेच अशा प्रकारे याचिका दाखल करण्याचा नियम आहे का, असाही सवाल केला. यावर संबंधित याचिका मागे घेण्याची विनंती शर्माच्या वकिलांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली आणि नव्याने अनुष्काला याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे.