पत्राचाळवासीयांचा म्हाडावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्राचाळवासीयांचा म्हाडावर मोर्चा
पत्राचाळवासीयांचा म्हाडावर मोर्चा

पत्राचाळवासीयांचा म्हाडावर मोर्चा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : एका तपाहून अधिक काळ रखडलेल्या गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगरमधील (पत्रा चाळ) मूळ भाडेकरूंना दरमहा ४० हजार रुपये द्यावेत, संस्थेसोबत सुधारित करार करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी शेकडो रहिवाशांनी बुधवारी (ता. २१) म्हाडा मुख्यालयावर मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांनी मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याचे आश्वासन दिले.

म्हाडाच्या ४७ एकर जमिनीवर वसलेल्या सिद्धार्थनगरच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांची सहकारी गृहनिर्माण संस्था, मे. गुरुआशीष कन्स्ट्रक्शन व म्हाडा यांच्यात त्रिपक्षीय करारनामा झाला होता; मात्र विकसकाने पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे रखडवल्याने आणि रहिवाशांचे भाडे न दिल्याने करारपत्रातील अटींनुसार म्हाडाने विकसक आणि संस्थेस टर्मिनेशन नोटीस जारी केली होती. न्यायालय आणि सरकारच्या आदेशानुसार म्हाडाने पत्रा चाळ गृहनिर्माण संस्थेच्या मूळ ६७२ सभासदांच्या पुनर्वसनासाठी आर ९ भूखंडावरील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ केला आहे.

कार्यक्रमात माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रहिवाशांना मार्च महिन्याच्या सुरुवातीस भाडे मिळेल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाने करारनाम्यानुसार रहिवाशांना १८ हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र रहिवाशांनी दरमहा ४० हजार रुपये भाडे देण्याची मागणी लावून धरली आहे. रहिवाशांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने रहिवाशांना २५ हजार रुपये भाडे देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाला रहिवाशांनी विरोध केला असून, रहिवाशांना ४० हजार रुपये भाडे मिळावे, मागील थकीत भाडे तत्काळ द्यावे, सुधारित करार करावा आणि पत्रा चाळीवरील वाढीव १.५०चा एफएसआय संस्थेला मोफत द्यावा, या मागण्यांसाठी रहिवाशांनी म्हाडावर मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो रहिवाशांनी सहभाग घेतला.