खासगी चार्जिंग स्टेशनचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी चार्जिंग स्टेशनचा मार्ग मोकळा
खासगी चार्जिंग स्टेशनचा मार्ग मोकळा

खासगी चार्जिंग स्टेशनचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा ः मिलिंद तांबे
मुंबई, ता. २१ : महाराष्ट्र सरकारने जून २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ लॉन्च केले. यानंतर इलेक्ट्रिक वाहनांची उत्पादन, खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली. यामुळे मुंबईसारख्या शहरात वाहनांच्या चार्जिंगची समस्या भेडसावू लागली. मुंबई महापालिकेने खासगी सोसायट्यांच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारण्याची परवानगी द्यावी, यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. यावर तोडगा म्हणून सोसायटीच्या आवारात ईव्ही चार्जर स्टेशन सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था विभागाने ना हरकत प्रमाणपत्राची विशेष तरतूद केली आहे. यामुळे खासगी सोसायट्यांमध्येही चार्जिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईत १० हजारांहून अधिक; तर राज्यात साधारणतः ९० हजार ईव्ही वाहनांची नोंद झाली आहे. मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान ई व्हेईकलच्या खरेदीमध्ये ११२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील वाहने त्यांच्या चार्जिंग गरजेच्या ८० टक्केपर्यंत होम चार्जिंगवर अवलंबून असतात. सध्या होम चार्जिंगला परवानगी तर नाहीच शिवाय चार्जिंगला अपेक्षित वेळेपेक्षा अधिक वेळही लागतो. यामुळे पर्याप्त चार्जिंग स्टेशन सुरू होईपर्यंत सोसायट्यांना चार्जिंग स्टेशनचा विचार सुरू झाला; मात्र यामध्ये परवानगीचा प्रश्न उभा ठाकला होता. सोसायट्यांमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक यांची परवानगी लागणार होती. यासाठी पालिकेने या विभागाकडे रीतसर परवानगीसाठी प्रयत्न सुरू केले होते.
......
रेल्वे, मेट्रो स्थानकांत चाचपणी
वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार राज्यात २०२५ पर्यंत २,१९,२४५; तर २०३० पर्यंत १२,०८, ७०४ ई-वाहनांची भर पडणार आहे. त्यासाठी २०२५ पर्यंत २१,०९६; तर २०३० पर्यंत १,४१,९८८ चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे. त्यासाठी साधारण ५५० मेगावॉट हॉर्स पॉवरची गरज भासणार आहे. त्यासाठी बेस्ट आगार, १३९ मेट्रो स्थानके, ५७ रेल्वेस्थानके, १०९९ खासगी कार्यालये आणि २४६ सरकारी आस्थापनांच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याबाबतची चाचपणी केली जाणार आहे.
.......
चार्जिंग पॉइंट सुरक्षितपणे स्थापित करणे आणि ईव्ही चार्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरक्षितता आणि एनओसीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि अधिसूचना देशात प्रथमच आहेत. मुंबई ईव्ही सेलने आपल्या नागरिकांचे हरित इंधनाकडे संक्रमण करण्यासाठी राज्य आणि शहरातील विविध विभागांसोबत कठोर परिश्रम घेतले आहेत.
- कौस्तुभ गोसावी, कन्सल्टंट, डब्ल्यूआरआय इंडिया