पूनावाला यांना तातडीने दिलासा देण्यास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूनावाला यांना तातडीने दिलासा देण्यास नकार
पूनावाला यांना तातडीने दिलासा देण्यास नकार

पूनावाला यांना तातडीने दिलासा देण्यास नकार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : कोविशिल्ड लशीची निर्मिती करणाऱ्या ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे सीईओ अदर पूनावाला यांना तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पूनावाला यांच्या वतीने योहान टेंग्रे आणि अंबर कोईरी यांच्यावर उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा करण्यात आला आहे. यूट्युब, ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांवर कोविशिल्ड आणि सिरमबाबत पोस्ट करण्यास मनाई करावी, अशी मागणी पूनावाला यांनी केली आहे.

गुरुवारी न्या. एन. जे. जमादार यांच्यापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने तातडीने याबाबत मनाई आदेश देण्यास नकार दिला. संबंधित प्रकरण मोठे असून यावर सविस्तर सुनावणी व्हायला हवी. सध्या एवढा वेळ उपलब्ध नाही, त्यामुळे दिलासा देऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच सुटीकालीन न्यायालयात दाद मागण्याची मुभादेखील न्यायालयाने पूनावाला यांना दिली आहे. पूनावाला यांनी याचिकेत यूट्युब आणि अन्य समाज माध्यमांना प्रतिवादी केले आहे.

यूट्युबच्या वतीने आज यावर बाजू मांडण्यात आली. यामध्ये यूट्युबच्या अमेरिकन कंपनीला प्रतिवादी करण्याचे सांगण्यात आले. कोविशिल्डला १२ देशांत मनाई करण्यात आली आहे, असा दावा काही समाज माध्यमांद्वारे करण्यात आला आहे. तसेच अन्य आरोपही प्रतिवादींनी केले आहेत. त्यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि कंपनीची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे टेंग्रे आणि कोईरी यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ३ जानेवारीला होणार आहे.