गारवा वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारवा वाढणार
गारवा वाढणार

गारवा वाढणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : काश्मीर खोरे, हिमाचलमधील अतिथंडी व बर्फवृष्टीमुळे पश्चिम राजस्थानच्या वायव्य दिशेकडून सह्याद्री व सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्रात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील २४ तासांत मुंबईसह राज्यभरातील किमान तापमान ५ ते ६ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात शुक्रवारपासून हुडहुडी जाणवण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ऐन डिसेंबरमध्ये गरमीने हैराण झालेल्यांना आता थंडीचा आनंद घेता येणार आहे.
शनिवार-रविवारी मुंबई, डहाणू, ठाण्यासह उत्तर कोकणातील काही भागांत १६ ते १८ अंशापर्यंत किमान तापमान घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान २० अंश आणि कुलाबा येथील २२.४ अंश असल्याची नोंद झाली. किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे, नंदुरबार जळगावासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमान १० ते १२ अंश, विदर्भातील उत्तरेकडील भागात १२ अंशापर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा हुडहुडी जाणवण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाचा परिणाम झाला होता. यामुळे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात दमट, ढगाळ हवामान आणि मध्येच रिमझिम पाऊस अशी स्थिती होती. परिणामी काही ठिकाणी अतिउकाडा; तर काही भागांत ढगाळ वातावरण होते.
...
हुडहुडी भरणारी थंडी
सध्या काश्मीर खोरे, हिमाचलमधील अतिथंडी व बर्फवृष्टीमुळे पश्चिम राजस्थानच्या वायव्य दिशेकडून सह्याद्री व सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या थंडीमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक; तसेच अहमदनगर, पुणे, औरंगाबादमध्ये शुक्रवारपासून ते मंगळवारीपर्यंत या पाच दिवसांत हुडहुडी भरणारी थंडी जाणवू शकेल. उर्वरित महाराष्ट्रात थंडी जाणवणार असली तरी थंडीची तीव्रता काहीशी कमी राहील, असा अंदाज आहे.
...
ढगाळ वातावरणाची शक्यता
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. ते पुढील ३ ते ४ दिवसांत श्रीलंका किनारपट्टीवरून कन्याकुमारीच्या टोकापर्यंत पोहोचेल. यामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश व कर्नाटकात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यात या वातावरणाचा कोणताही परिणाम जाणवणार नाही. दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मात्र तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.