तेलगीवरील वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेलगीवरील वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात
तेलगीवरील वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात

तेलगीवरील वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : कोट्यवधी रुपयांच्या मुद्रांक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगीच्या जीवनावर आधारित ‘स्कॅम २००३ तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तेलगीची मुलगी आणि जावयाने वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात शहर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. उद्या (ता. २३) यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. गुरुवारी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत शहर दिवाणी न्यायाधीश आर. के. क्षीरसागर यांनी आपला निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे.

‘स्कॅम २००३ तेलगी स्टोरी’ याविरोधात तेलगीची मुलगी सना इरफान हिने वेबसीरिजचे निर्माते अॅपलॉज एंटरटेन्मेंटचे संचालक हन्सल मेहता, सरव्यवस्थापक प्रसून गर्ग आणि सोनी लाईव्ह यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. या वेबसीरिजसाठी आमच्या कुटुंबीयांची परवानगी घेण्यात आली नसल्याचा आरोप सना यांनी केला आहे. तसेच वेबसीरिजचे प्रदर्शन थांबवण्याची मागणीही केली आहे. ही वेबसीरिज २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकावर आधारित आहे; मात्र पुस्तकातील तथ्यांमध्ये विसंगती आहे. या वेब सीरिजमुळे आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. ती प्रदर्शित झाल्यास आमचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, असा दावा सनाने केला आहे.