राज्यातील ‘गुरुजी’ अद्ययावत होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील ‘गुरुजी’ अद्ययावत होणार
राज्यातील ‘गुरुजी’ अद्ययावत होणार

राज्यातील ‘गुरुजी’ अद्ययावत होणार

sakal_logo
By

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : राज्यातील शालेय शिक्षणाची आणि शिक्षकांची ढासळलेली गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी लवकरच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयाधारित मूल्यांकन करून त्यांच्यासाठी ऑनलाईन व ब्लेंडेड मोड कोर्स राबविला जाणार आहे. या माध्यमातून शिक्षक, मुख्याध्यापक यांना अद्ययावत (अपडेट) केले जाणार आहे.

शिक्षकांची गुणवत्ता सुधारली जावी, यासाठी राज्यात ‘स्टार्स’ प्रकल्पांतर्गत २०२२-२३ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयाधारित मूल्यांकन केले जाणार आहेत. त्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी गरजाधिष्ठित ऑनलाईन व ब्लेंडेड मोड कोर्सची निर्मिती केली जात असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

अनुदानित आणि सरकारी शाळेतील शिक्षकांना लाखो रुपयांचे वेतन आणि इतर सोयीसुविधा मिळूनही खूप मोठ्या प्रमाणावर शालेय शिक्षणातील गुणवत्ता सुधारू शकत नसल्याचे वेळोवेळी समोर आले. राज्यातील अनेक संस्थांनी त्यासाठी आपल्या अहवालात त्या उणिवा दाखवून दिल्या होत्या. अनुदानित आणि सरकारी शाळेतील काही शिक्षक आपल्या अध्ययन पद्धतीत नीट योगदान देत नसल्याने तसेच ते वेळोवेळी अद्ययावत होत नसल्याने गुणवत्तेचे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना अद्ययावत करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात निष्ठा १.०, निष्ठा २.० चे आयोजन करून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी ऑनलाईन निष्ठा ३.०चे (एफएलएन) आयोजन करण्यात आले होते, त्यात राज्यातील हजारो शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला होता.

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेत मागील नऊ वर्षांत भावी शिक्षक उमेदवार उत्तीर्ण होण्याची संख्या सरासरी चार टक्क्यांच्या वर पोहचू शकलेली नाही. नुकताच जाहीर झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयाच्या पेपरमध्ये केवळ १.४५ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेवर खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने पाऊले उचलली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ‘निपुण महाराष्ट्र’ हे अभियानदेखील राबवले जात आहे.

ब्लेंडेड मोड कोर्स म्हणजे काय?
मिश्र प्रणाली किंवा ब्लेंडेड मोड कोर्स म्हणजे एक औपचारिक शिक्षण कार्यक्रम ज्यात विद्यार्थी पाठ्यक्रमाचा एक भाग शाळेत पूर्ण करतो; तर दुसरा भाग डिजिटल किंवा ऑनलाईन संसाधनांचा वापर करून पूर्ण करतो. या शिक्षण प्रणालीत वेळ, जागा, वेग याचे नियंत्रण विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.

अशी आहे शाळाची माहिती (यू डायस २०२१-२२ नुसार)
राज्यातील एकूण शाळा : १,०९,६०५
एकूण विद्यार्थी संख्या : २,२५,८६,६९५
एकूण शिक्षक संख्या : ७,४८,५८९
विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर : ३०
प्रतिशाळा शिक्षक : ७
प्रतिशाळा विद्यार्थी संख्या : २०६