वाढवण बंदरातील गुंतवणुकीची माहिती फसवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढवण बंदरातील गुंतवणुकीची माहिती फसवी
वाढवण बंदरातील गुंतवणुकीची माहिती फसवी

वाढवण बंदरातील गुंतवणुकीची माहिती फसवी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : वाढवण येथील बंदर आधुनिक पद्धतीचे उभारले जाणार आहे. या प्रकल्पामध्ये दीड लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे उत्तर सरकारकडून देण्यात आले. मात्र ही माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारात प्रकल्पासाठी ६५ हजार कोटी रुपये आणि दीड लाख कोटींची गुंतवणूक करण्यासाठी अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी वाढवण बंदरामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार उद्‍ध्‍वस्त होणार असून त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून काय उपाययोजना आखल्या आहेत, अशी विचारणा केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मच्छीमारांसाठी आधुनिक पद्धतीचे बंदर उभारले जाईल आणि सदर प्रकल्पाला होणारा खर्च ६५ हजार कोटी होणार असून या दीड लाख कोटींहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे उत्तर देण्यात आले; परंतु माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार ६५ हजार कोटी रुपये उभारणीसाठी आणि अधिक गुंतवणूक करण्यासाठी अद्याप कसलेच नियोजन करण्यात आले नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे, अशी माहिती तांडेल यांनी दिली.


कर्ज उभारणीसाठी प्रस्ताव नाही
माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप शासकीय, निमशासकीय, खासगी कंपन्या, परकीय खासगी कंपन्या, शासकीय तथा खासगी बँकाकडून निधी उपलब्ध होणार नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्याचबरोबर जे.एन.पी.टी. प्राधिकरणाने सदर बंदराच्या निर्मितीकरिता कर्ज उभारणीसाठी सरकारी संस्था, सरकारी विभाग, खासगी कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा बँकांकडे कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव अद्याप सादर करण्यात आला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

विधिमंडळात चुकीची माहिती
कोणत्याही खासगी कंपनीकडून अद्याप गुंतवणूक करण्यात आलेली नाही. तसेच सदर बंदर उभारणीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून परकीय गुंतवणुकीचे अद्याप नियोजन झाले नसल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीमध्ये प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. यावरून उपमुख्यमंत्र्यांकडून मच्छीमारांची फसवणूक करण्याचे काम विधिमंडळात झाले असल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे.

महाराष्ट्रातून जे प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत, त्यामध्ये ५० ते ६० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार होती; परंतु वाढवण बंदर प्रकल्पामुळे राज्यात फक्त एक हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असून बंदर परिसरातील १६ गावांमधील २०,८०९ मच्छीमारांना कायम स्वरूपात मासेमारी करता येणार नसल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
- देवेंद्र दामोदर तांडेल,
अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती