आजपासून नांदेड येथे वीर बाल दिवस व नांदेड महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून नांदेड येथे वीर बाल दिवस व नांदेड महोत्सव
आजपासून नांदेड येथे वीर बाल दिवस व नांदेड महोत्सव

आजपासून नांदेड येथे वीर बाल दिवस व नांदेड महोत्सव

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : नांदेड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रविवारी, २५ आणि २६ डिसेंबर रोजी नांदेड येथे वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग, नांदेड व गुरद्वारा प्रशासन, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडमध्ये हा महोत्सव साजरा होणार असून यात धार्मिक कार्यक्रम गुरुद्वारा परिसरात होणार आहेत; तर सांस्कृतिक कार्यक्रम गुरुद्वारा परिसराबाहेर सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये गुरुग्रंथ साहिब भवन येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यासाठी देशभरातील विविध मान्यवर आणि कलावंत सहभागी होतील; तर गतका (मार्शल आर्टस्) हा कार्यक्रम बंदा घाट येथे होईल. गुरू गोबिंद सिंह आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गोबिंद बाग येथे विशेष अशा लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे; तर शबद कीर्तन गुरुग्रंथ साहिब भवन येथे होईल.
पहिल्या दिवशी सकाळी नांदेड जिल्ह्यातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी यांची एक मोठी पदयात्रा काढली जाणार आहे. त्यात शीख धर्माचे दहावे गुरू गोबिंदसिंगजी हे नांदेड येथे राहिले, त्यांच्या पवित्र स्मृतीमुळे नांदेड शहराला जगभरात एक वेगळी ओळख मिळाली. त्या पार्श्वभूमीवर नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार वीर बाल दिवस साजरा केला जात असल्याचे पर्यटन संचालनालयाकडून सांगण्यात आले. गुरु गोबिंदसिंगजी यांचे पुत्र साहेबजादे बाबा जोरावर सिंघजी आणि साहेबजादे बाबा फतेह सिंघजी यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. नांदेड महोत्सवाला येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांना जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळी भेटी देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.