
मुंबईचा पारा १५ अंशाखाली
मुंबई, ता. २५ : मुंबईसह राज्यभरात तापमानात कमालीची घसरण झाली. त्यामुळे मुंबईकरांनाही हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. आज सांताक्रूझ येथील किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली घसरल्याचे दिसले. पुढील दोन दिवस मुंबईत बोचरी थंडी जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
थंडीचे तीन महिने सरत आले तरी मुंबईत झोंबणारी थंडी काही जाणवत नव्हती. त्यामुळे या वर्षी मुंबईकरांना थंडीचा आनंद मिळेल की नाही याबाबत साशंकता होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानात घसरण व्हायला सुरुवात झाली आहे. पहाटे जाणवणाऱ्या गारव्यामुळे शेकोटीची गरजही भासू लागली आहे. बऱ्याच परिसरात धुक्याची चादर पसरत असल्याने दृश्यमानता कमी जाणवत आहे. त्यामुळे चालकांना अंदाज लावत वाहने चालवावी लागली.
उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने त्याचा परिणाम मुंबईसह राज्यभरात दिसू लागला आहे. मुंबईतील किमान तापमानात घसरण झाली असून तापमान १५ अंशांपर्यंत खाली आले आहे. रविवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १५ अंशावर, कुलाब्यात यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान १८.५ अंशांपर्यंत खाली आले आहे. शनिवारच्या तुलनेत सांताक्रूझ येथील किमान तापमान एक अंशाने आणि कुलाबा येथील ०.३ अंशाने कमी झाल्याची नोंद झाली. सरासरी किमान तापमानाच्या तुलनेत सांताक्रूझ आणि कुलाबा येथील किमान तापमान अनुक्रमे ३ अंश आणि २ अंशांनी कमी झाले.
...
आणखी दोन दिवस
गेल्या दोन दिवसांपासून जाणवणारी थंडी पुढील आणखी दोन दिवस जाणवण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र हळूहळू तापमान वाढण्याचा अंदाज आहे. सध्या उत्तरेकडून वाहणारे वारे हे कोरड्या स्वरूपाचे आहेत; मात्र येत्या दोन दिवसांत दक्षिण दिशेकडून वारे वाहू लागणार असून ते दमट स्वरूपाचे असतील. त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.