
दिग्दर्शक कपूरविरोधातील विनयभंगाची तक्रार रद्दबातल
मुंबई, ता. २६ : दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्याविरोधात दाखल केलेली विनयभंगाची फौजदारी तक्रार महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रद्दबातल केली आहे. घटना घडल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी या प्रकरणात पीडित महिलेने तक्रारी दाखल करणे संभ्रमाचे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
जॉली एलएलबी या सिनेमाचे कपूर हे दिग्दर्शक आहेत. सन २०१२ मध्ये ही घटना घडली होती. त्यापूर्वी सहा वर्षे ते एकमेकांना ओळखत होते. घटना घडली तेव्हा काही मित्रमंडळी तक्रारदाराच्या घरी आली होती. यादरम्यान रात्री उशिरा विनयभंगाची घटना घडली, असे तक्रारीत म्हटले आहे; मात्र त्यानंतर दोन वर्षे महिलेने तक्रार दाखल केली नाही. सन २०१४ मध्ये आलेल्या ‘मी टू’ मोहिमेत याबाबत उलगडा झाला आणि तक्रार दाखल करण्यात आली. न्यायालयाने या विलंबाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच पोलिसांनी लिहिलेली तारीख आणि महिलेने दिलेली तारीख यामध्ये विसंगती आहे. अशा बाबींवर न्यायालयाने संभ्रम व्यक्त केला आहे. तसेच महिलेने रात्री उशिरा सुरक्षारक्षकाला का नाही बोलावले, असा सवाल केला आहे. तपासात अनेक उणिवा आहेत, असे स्पष्ट करून न्यायालयाने कपूर यांची आरोपातून सुटका केली आहे.