
सांताक्रूझमधील पालिका शाळा कात टकणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : सांताक्रूझ पूर्व विभागातील प्रभात कॉलनी महापालिका शाळा लवकरच कात टाकणार आहे. या दुमजली शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला असून पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
सांताक्रूझ पूर्व अर्थात पालिकेच्या ‘एच पूर्व’ विभागातील प्रभात कॉलनी महापालिका दुमजली शाळा इमारतीची रचना आरसीसी लोड बेरिंग स्ट्रक्चर व तळमजल्यावर उतरते छप्पर अशी आहे. शाळेच्या दुरुस्ती कामासाठी शिक्षण अधिकारी (शिक्षण) यांच्याकडून शिफारस करण्यात आली होती. मे. ट्रायो आर्च कन्सल्टंट यांनी शाळेचे संरक्षणात्मक परीक्षण केले. शाळा इमारत ‘सी टू बी’ गटात मोडत असल्याचा अहवाल देत तिची दुरुस्ती करण्याचे संस्थेने सुचवले होते. त्यासाठीचे अंदाजपत्र मसुदा निविदा तयार करणे, कामाचे परीवेक्षण करण्यासाठी मे. ट्रायो आर्च कन्सल्टंट यांची व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शाळेच्या डागडुजीच्या कामाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. यात मे. एस. पी. इंजिनिअर्स यांनी दोन कोटी ९७ लाख ७३ हजार ५५२ रुपयांची लघुत्तम निविदा भरल्याने त्यांना हे काम देण्यात आले आहे. याचा संपूर्ण खर्च चार कोटी २२ हजार ६३८ रुपये होणार असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या दप्तरी पाठवण्यात आला. आयुक्तांची मंजुरी मिळाल्याने आता हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
...असा होणार कायापालट
शालेय इमारतीचे आरसीसी व संरचनात्मक दुरुस्ती, विटांचे काम, लादीकाम, लोखंडी गेट, ग्रील खिडक्या व दरवाजे यांची दुरुस्ती इमारतीच्या आतील व बाहेरील सर्व भागांना रंग, विद्युत उपकरण तारा दुरुस्ती व बदल, शाळेची संरचनात्मक कुंपण भिंतीची दुरुस्ती अशी काही कामे करण्यात येणार आहेत. यासाठी तीन कोटी ८४ लाख ९९ हजार ५८७ रुपये अंदाजित खर्च वर्तवण्यात आला आहे.