सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे द्या!
सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे द्या!

सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे द्या!

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : महापालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या ३६ इमारतींची पुनर्बांधणी होणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना राहती घरे खाली करण्यासाठी सांगण्यात आले असून ठराविक भाडे घेऊन स्वतःची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. कर्मचारी मात्र साशंक असून घरे खाली केल्यास पुन्हा घरे मिळणार नाहीत, अशी भीती त्यांना सतावते आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेमधून कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या या मागणीला भाजपनेही पाठिंबा दिला आहे.
कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छता कर्मचाऱ्यांनीदेखील मोठी जोखीम घेऊन काम केले. या कर्मचाऱ्यांना २५-३० वर्षे सेवा देऊनही अद्याप हक्काची घरे मिळालेली नाहीत. अशात आता घरे खाली केली तर राहायचे कुठे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.
मुंबई महापालिकेत सुमारे २९ हजारांहून अधिक सफाई कर्मचारी आहेत. त्यापैकी फक्त ५,५९२ कामगारांना सेवानिवासस्थाने देण्यात आली आहेत. ही निवासस्थाने असलेल्या अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. माझगाव येथील बाबू गेनू ही इमारत २०१३ मध्ये कोसळून यामध्ये ६९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी बनवली. त्यानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या ४६ वसाहतींपैकी ३६ वसाहती मोडकळीस आल्या असून त्याची पुनर्बांधणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
...
आंदोलनाची तयारी
आपल्या हक्काच्या घरांसाठी सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीला भाजपने पाठिंबा दिला आहे. सध्या मुलांच्या शाळा-कॉलेजच्या परीक्षा आहेत. शिवाय भाड्यापोटी पालिका देत असलेल्या १४ हजार रुपयांत त्याच परिसरात घर उपलब्ध होणे शक्य नाही. महापालिका आयुक्त याबाबत काही ठोस भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत ही घरे खाली करू नका, अशी भूमिका भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते व माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी घेतली आहे.
...
आश्रय योजनेला विरोध
‘आमचा आश्रय योजनेला विरोध असून आमची मागणी ही सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेद्वारे घरे मिळावीत अशी आहे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घराच्या प्रश्नासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घालणार असून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,’ असे प्रभाकर शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.
.....