
वाऱ्याने दिशा बदललयाने तापमानात किंचित वाढ
मुंबई, ता. २६ : किमान तापमान खाली गेल्याने गेल्या तीन दिवसांपासून मुंबईकरांनी हुडहुडीचा आनंद घेतला. ही थंडी पुढील २ ते ३ दिवस जाणवण्याची शक्यता होती; मात्र उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याने दिशा बदलल्याने आज तापमानात किंचित वाढ झाल्याचे दिसले.
रविवारी मुंबईत मोसमातील निचांकी तापमानाची नोंद झाली होती. पारा १५ अंशापर्यंत खाली गेल्याने चांगलाच गारठा जाणवला. आज मात्र पारा २ ते ३ अंशांनी वाढल्याचे दिसले. आज किमान तापमान सांताक्रूझ १६; तर कुलाबा १९.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कमाल तापमानातही काहीशी वाढ झाली असून सांताक्रूझ २९.५; तर कुलाबा २८.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
दक्षिणेकडून वाहणारे वारे काहीसे दमट असल्याने त्यांचाही परिणाम वातावरणावर झाला आहे. परिणामी, तापमानात काहीशी वाढ झाली आहे. असे असले तरी किमान तापमानात फारशी घट न होता ते १६ ते १८ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे; मात्र या बदलाचा फार मोठा परिणाम मुंबईतील वातावरणावर जाणवणार नाही, असे अंदाज हवामान विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.