आता मनसोक्त पोहा : जलतरण तलाव सदस्यता घेण्याची संधी ; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता मनसोक्त पोहा : जलतरण तलाव सदस्यता घेण्याची संधी ;
आता मनसोक्त पोहा : जलतरण तलाव सदस्यता घेण्याची संधी ;

आता मनसोक्त पोहा : जलतरण तलाव सदस्यता घेण्याची संधी ;

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिकेच्या चार तरण तलावांसाठी आतापर्यंत केवळ वार्षिक सदस्यत्व देण्यात येत होते; मात्र आता त्रैमासिक व मासिक सदस्यत्व देण्याचा मार्गही महापालिका प्रशासनाने खुला केला आहे. त्याचबरोबर सात ठिकाणी नवीन जलतरण तलाव विकसित करण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. जलतरण तलावविषयक सभासदत्व प्रक्रिया आणि संबंधित कार्यपद्धती यात सातत्याने सुधारणा करण्यात आल्या असून, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निर्णयाने पोहोण्यास इच्छुक असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नवीन नियमावलीनुसार सदस्यत्व असलेल्या सभासदाला सोबत एका सहकाऱ्यालाही पोहोण्यास नेता येणार आहे; मात्र त्यासाठी अग्रीम स्वरूपात दैनिक शुल्क भरणे आवश्यक असेल. तसेच ज्यांना सदस्यत्व मिळू शकणार नाही, अशा इच्छुकांसाठी ऑनलाईन प्रतीक्षा यादीचा पर्यायदेखील खुला करण्यात आला आहे. पालिकेच्या तरण तलावात ऑनलाईन पद्धतीने ‘लाईव्ह डॅशबोर्ड’ देखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे एका विशिष्ट वेळी उपस्थित असणाऱ्या सभासदांची माहिती तात्काळ उपलब्ध होणार असल्याची माहिती उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली.

या लिंकवर नोंदणी :
नवीन वर्षात ३ जानेवारीपासून नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांना https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळासह पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या होम पेजवर जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे. त्यावर नोंदणी करण्यात येणार आहे.

असे असेल शुल्क
प्रकार शुल्क
वार्षिक ८,००० ते १०,०००
त्रैमासिक २,२३० ते २,९००
मासिक १,३००
सहकारी (दैनंदिन) २४०
संपूर्ण तलाव आरक्षित (दुपारी) २०,४३०(प्रतितास)
प्रतीक्षा यादी ५००

महिलांसाठी राखीव वेळ
सर्व तरण तलावांच्या वेळा सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत असेल. महिला सभासदांसाठी राखीव सत्र सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ असे असेल.

७ नवीन जलतरण तलाव
कांदरपाडा जलतरण तलाव, दहिसर पश्चिम
चाचा नेहरू मैदान जलतरण तलाव, मालाड पश्चिम
गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी, पश्चिम
कोंडिविटा गाव जलतरण तलाव, अंधेरी, पूर्व
वरळी जलाशय टेकडी जलतरण तलाव, वरळी
टागोर नगर जलतरण तलाव, विक्रोळी, पूर्व
वडाळा अग्निशमन केंद्र जलतरण तलाव, वडाळा