
थर्टी फर्स्ट मुंबईबाहेर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : हॉटेलमध्ये होणारी गर्दी, वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या, यामुळे अनेक मुंबईकर थर्टी फर्स्टसाठी मुंबईबाहेरील डेस्टिनेशनला अधिक पसंती देत असल्याचे समोर आले आहे. कोरोनानंतर या वेळी जोरदार बुकिंग मिळेल, अशी अपेक्षा होती. हॉटेलचालकांनी थर्टी फर्स्टसाठी जय्यत तयारी केली असली तरी अपेक्षित बुकिंग मिळत नसल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी प्रत्येकाने आपापले प्लॅनिंग केले आहे. मात्र मुंबईतील ६० टक्के ग्राहक मुंबईबाहेरील स्थळांना पसंती देत असल्याचे आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. मुंबईत अनेक हॉटेलांमध्ये जागा छोटी असल्याने ग्राहकांची गर्दी होते. अशी गर्दी अनेक ग्राहकांना आवडत नाही. याशिवाय विकेंडला बऱ्याचदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हॉटेलांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आपले वाहन पार्क करण्यासाठी बऱ्याचदा जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक ग्राहक मुंबईबाहेर जाण्यास पसंती देत असल्याचेही शेट्टी म्हणाले.
यावेळी सरकारने हॉटेलची वेळ वाढवली आहे. असे असले तरी बाकी नियमावली फार क्लिष्ट आहे. यामुळेदेखील बरेच ग्राहक नाराजी व्यक्त करतात. यामुळे अनेक ग्राहकांनी मुंबईजवळील येऊर, कर्जत, लोणावळा, महाबळेश्वर आदी ठिकाणी जाणे पसंत केले आहे. याशिवाय गोवा, दिव-दमण आणि परदेशात जाण्याचे प्रमाणही या वेळी वाढल्याचे दिसते. कोरोना काळानंतर हे पहिलेच वर्ष असल्याने कंटाळलेले ग्राहक सलग आठवडाभर बाहेर जाणे पसंत करत असल्याचे असल्याचे डॅफोडील हॉटेलचे मालक डॉ. सतीश शेट्टी यांनी सांगितले.
...
अपेक्षित बुकिंग नाही!
थर्टी फर्स्टसाठी आम्ही तयारी केली आहे. ऑनलाईन बुकिंग, सुरक्षा यावरही भर दिला आहे. मात्र तरीदेखील अपेक्षित बुकिंग मिळत नाही. मुंबईत होणारी गर्दी, तसेच रात्री जागोजागी होणारी नाकाबंदी, ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई यामुळेदेखील ग्राहक वैतागले असून ते बाहेर जाण्यास पसंती देत असल्याची शक्यता ‘आहार’चे सचिव सुधाकर शेट्टी यांनी व्यक्त केली.