अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा वावर अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा वावर अधिक
अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा वावर अधिक

अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा वावर अधिक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : अरबी समुद्रात ‘हंपबॅक डॉल्फिन’चा वावर अधिक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ‘कोकण सिटी रिसर्च टीम’चे सदस्य मिहीर सुळे यांनी महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानच्या साह्याने राज्याच्या किनाऱ्या‍लगत २०२०-२२ या काळात हंपबॅक डॉल्फिनवर अभ्यास केला. या अभ्यासातून महाराष्ट्राच्या समुद्री भागात हंपबॅक डॉल्फिन्सच्या अधिवासाबाबत माहिती मिळाली आहे. हंपबॅक डॉल्फिनची संख्या भारताचा पूर्व किनारा/बांगलादेशमधील डॉल्फिनच्या संख्येशी संबंधित आहे, असेही अभ्यासातून समोर आले आहे.

कांदळवन कक्ष आणि कोकण सिटी रिसर्च टीमने हंपबॅक डॉल्फिनच्या अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील किनारपट्टीवरील मच्छीमारांकडून माहिती गोळा केली. यात अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा सलग वावर दिसून आला. हे डॉल्फिन ३० ते ३५ मीटरपेक्षा कमी खोलीच्या पाण्यात आढळतात आणि बहुतेक वेळा मोठ्या भरतीच्या वेळी मोठ्या खाड्यांमध्ये प्रवेश करतात. उथळ पाण्यातील अधिवासामुळे हंपबॅक डॉल्फिन सामान्यतः मच्छीमारांना त्यांच्या जहाजांमधून आणि किनाऱ्यावरूनही दिसतात.

दुसऱ्या टप्प्यात अपघाताने जाळ्यात अडकून मृत पावलेल्या व किनाऱ्यावर वाहून आलेल्या सागरी सस्तन प्राण्यांच्या शवांमधील उतींचे नमुने गोळा करण्यात आले. यासाठी महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना किनाऱ्यावर वाहून आलेल्या सागरी सस्तन प्राण्यांना हाताळण्यासाठीचे प्रशिक्षणही देण्यात आले. या अभ्यासातून हंपबॅक डॉल्फिनचे नमुने वापरून, अनुवांशिक विश्लेषण केले गेले. भारताच्या उर्वरित पश्चिम किनाऱ्यावरील इतर नमुन्यांची राज्याच्या किनारपट्टीवर घेतलेल्या नमुन्यांशी तुलना केल्यावर प्राण्यांमध्ये जनुक प्रवाह आढळून आले. महाराष्ट्राच्या किनाऱ्या‍वरील हंपबॅक डॉल्फिनची संख्या भारताच्या पूर्व किनाऱ्याशी, बांगलादेशमधील संख्येशी संबंधित आहे, असेही अभ्यासातून स्पष्ट झाले.

दोन प्रजाती
सध्या भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर हंपबॅक डॉल्फिनच्या दोन वेगवेगळ्या प्रजाती असल्याचे मानले जाते. इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन पश्चिम किनारपट्टीवर आणि इंडो-पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिन भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आढळतात. ओमान आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हंपबॅक डॉल्फिनच्या संख्येमध्ये वेगळेपणा दिसून येतो, असेही अभ्यासातून समोर आले आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सागरी सस्तन प्राण्यांच्या सुमारे १२ प्रजाती आहेत. ज्यांचे दस्तऐवजीकरण आधीच्या अभ्यासात आणि जाळ्यात अडकण्याच्या नोंदींमध्ये आढळते. आपल्या किनारपट्टीवर त्यांच्या अधिवासाची फारशी माहिती नाही. या अभ्यासातून महाराष्ट्राच्या समुद्री भागात हंपबॅक डॉल्फिन्सच्या अधिवासाबाबत माहिती मिळाली आहे.
-मिहिर मुळे, अभ्यासक

महाराष्ट्रातील डॉल्फिन्सच्या वैज्ञानिक अभ्यासासंदर्भात सुरू केलेल्या विविध संशोधन प्रकल्पांपैकी हा अभ्यास एक आहे. या अभ्यासामुळे आम्हाला राज्यातील डॉल्फिनचे अधिक चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यास मदत होईल.
- वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष आणि कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान