विकेंडसाठी नॅशनल पार्क,राणी बागेत ही पर्यटकांची गर्दी : पेंग्विन सह बोटिंग,सिंह-टायगर सफारी ला पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकेंडसाठी नॅशनल पार्क,राणी बागेत ही पर्यटकांची गर्दी :  पेंग्विन सह बोटिंग,सिंह-टायगर सफारी ला पसंती
विकेंडसाठी नॅशनल पार्क,राणी बागेत ही पर्यटकांची गर्दी : पेंग्विन सह बोटिंग,सिंह-टायगर सफारी ला पसंती

विकेंडसाठी नॅशनल पार्क,राणी बागेत ही पर्यटकांची गर्दी : पेंग्विन सह बोटिंग,सिंह-टायगर सफारी ला पसंती

sakal_logo
By

बोटिंग, टायगर सफारी अन् पेंग्विनची क्रेझ!
नॅशनल पार्क आणि राणी बागेत पर्यटकांचा प्राण्यांसोबत नव वर्षाचा जल्लोष

नितीन बिनेकर ः मुंबई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क आणि वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीचा बाग) सध्या पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. नाताळची सुट्टी आणि त्यात ‘थर्टी फर्स्ट’च्या उत्साहामुळे सलग आठवडाभर निवांत असलेल्या पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह निसर्गाच्या सान्निध्यात जीव रमवण्यास प्राधान्य दिले. बोटिंग, टायगर सफारी आणि पेंग्विनच्या साथीने त्यांनी नववर्ष स्वागताचा जल्लोष केला.
--

कोरोनाच्या दीर्घकाळानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त ‘ईयर एण्ड’ साजरा करता येणार असल्याने शनिवारी मुंबईकरांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. नाताळच्या सुट्टीपासून बोरिवलीतील नॅशनल पार्क आणि भायखळ्यातील राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. कोविड काळात रोडावलेल्या पर्यटकांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. नेहमीपेक्षा यंदा वर्षअखेरीस आठवडाभरात पर्यटकांची संख्या तिपटीने वाढल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नॅशनल पार्कातील नैसर्गिक वनसंपदेसह तेथील बोटिंग आणि सिंह सफारी मुख्य आकर्षण ठरले आहे. गुजरातहून नॅशनल पार्कात आलेली सिंहाची जोडी पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे. बंद असलेली सिंह सफारी पुन्हा सुरू झाली आहे. चार वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारी बंद होती. सफारी सुरू झाल्यानंतर नव्या सिंहांच्या जोडीला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. वाघ, हरीण, चितळ, माकड, नीलगाय इत्यादींसारखे प्राणी पाहून अगदी जवळून पाहून पर्यटक हरखून जात आहेत.

सिंह सफारी अन् नौका विहाराला पसंती
नाताळच्या सुट्टीनिमित्त नॅशनल पार्कात मुंबईतीलच नाही, तर देशभरातील पर्यटकांचा ओढा सुरू आहे. विदेशी पर्यटकही नॅशनल पार्ककडे आकर्षित होत आहेत. नॅशनल पार्कातील सिंह सफारी प्रसिद्ध असून दररोज एक हजारांहून अधिक तिकिटे विकली जात आहेत. परिणामी दररोज एक लाखाहून अधिक महसूल मिळत आहे. नाताळच्या दिवशी सुमारे दीड हजार पर्यटकांनी सिंह सफारीचा आनंद लुटला. गुरुवारी १ हजार ८५ पर्यटकांची नोंद झाली. सध्या चारऐवजी एकूण सहा गाड्यांद्वारे पर्यटकांना वेळेत सिंह सफारी घडवली जात आहे. नौका विहारही सरस ठरत आहे. दोन-चार-सहा सीटर बोटी घेऊन पर्यटक कुटुंबासह नौका सफारीचा आनंद घेत आहेत. सध्या सुरू असलेल्या वीकेंडमध्ये दररोज सुमारे १५० ते २०० पर्यटक बोटिंग करत आहेत.

राणीबागेत मुक्त विहार
१. नूतनीकरणानंतर राणीबाग अधिक आकर्षक दिसत आहे. राणीबागेत पेंग्विन, वाघ, बिबटे, कोल्हे, लांडगे इत्यादींसारखे नवीन तरुण प्राणी दाखल झाले आहेत. दररोज १२ ते १५ हजार पर्यटक येत आहेत. शनिवार-रविवारी पर्यटकांची विक्रमी गर्दी उसळत आहे. वीकेंडला तीस हजारांहून अधिक पर्यटक दाखल होत आहेत.
२. नवीन राणी बागेचे बदललेले रूप पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली आहे. पेंग्विनला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या रांगा लागत आहेत. भल्या मोठ्या काचेतून वाघ, बिबट्या, अस्वल, पाणघोडा, हत्ती, विविध पक्षी पाहण्याची आणि निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची मजा पर्यटक लुटत असल्याचे दिसून येत आहे.
३. पेंग्विन कक्षाच्या बाहेर तिकीट काढण्यासाठी पर्यटकांच्या लांब रांगा लागत आहेत. नाताळच्या दिवशी राणीबागेत ३१ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. गुरुवारी २३ हजार; तर शनिवारी ३० हजारांहून अधिक पर्यटकांची राणीबागेत उपस्थिती होती. परिणामी दररोज ७ ते ११ लाखांहून अधिक महसूल प्रशासनाला मिळत आहे.

सिंहांची जोडी आल्यापासून पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कोरोना काळापासून रोडावलेली पर्यटकांची संख्या वाढत आहे. बोटिंगसह व्याघ्र आणि सिंह सफारीला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वीकेंडला गर्दीत भर पडत आहे.
- रेवती कुलकर्णी, सहसंचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (दक्षिण विभाग)

उद्यानाचे नूतनीकरण केल्यापासून पर्यटकांचा ओघ सुरू आहे. पेंग्विन मुख्य आकर्षण तर आहेच, शिवाय वाघ, बिबटे आणि इतर प्राण्यांना पाहण्यासाठीही गर्दी होत आहे. गर्दीच्या नियोजनासाठी कर्मचारी वाढवण्यासोबतच ऑनलाईन बुकिंगवर भर देत आहोत. उद्यान मुंबईतील पर्यटकांचे पहिले आवडते स्थळ बनत असल्याचा आनंद आहे.
- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय
........