राज्यपालांकडून दर्जेदार साहित्यकृतींचे रसग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांकडून दर्जेदार साहित्यकृतींचे रसग्रहण
राज्यपालांकडून दर्जेदार साहित्यकृतींचे रसग्रहण

राज्यपालांकडून दर्जेदार साहित्यकृतींचे रसग्रहण

sakal_logo
By

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : राज्यपालांसारख्या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर असताना आणि धकाधकीच्या जीवनातही भगतसिंह कोश्यारी यांना आपले वाचन प्रेम स्वस्थ बसू देत नाही. सरत्या वर्षात विविध वक्तव्यांवरून त्यांना टीकेचा सामना करावा लागला असला, तरी विविध विषयांवरील पुस्तके वाचून ती हातावेगळी केली आहेत. समर्थ रामदासांच्या ‘दासबोधा’चा हिंदी आणि मराठी अनुवाद तसेच हिंदी, कन्नड, तामिळ आणि इंग्रजी भाषांमधील साहित्यही त्यांनी वाचून काढले आहेत. एक आदर्श जीवन जगण्यासाठी रामदास स्वामींनी केलेले मार्गदर्शन त्यांनी समजून घेतले.

‘साधारण ४० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीचा हिंदी अनुवाद वाचला होता. महाराष्ट्रात आल्यावर ‘दासबोध’ वाचण्याचे सौभाग्य मिळाले,’ असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. विमान प्रवासात बुकर प्राईज विजेते गीतांजली श्री यांचे ‘रेत समाधी’ हे पुस्तक वाचण्याचा योग आला. प्रसिद्ध कन्नड लेखक भैरप्पा यांच्या ‘आवरण’ पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीच्या माध्यमातून भारताचा इतिहास समजून घेणे हादेखील एक अनुभव होता. भैरप्पा यांच्या ‘उत्तरकांड’चा इंग्रजी अनुवाददेखील आवडल्याचे राज्यपाल म्हणाले.

विशेष म्हणजे डी. के. हरी व त्यांची पत्नी डी. के. हेमा हरी यांचे ‘काशी-तमिलगम’ (भारताचे आत्मचरित्र) वाचले. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत भगवान शंकर यांना काशीपासून कांचीपर्यंत जोडण्याचा एक अनोखा प्रयत्न त्यांनी केला आहे. राजकारण-समाजकारणाच्या धकाधकीतदेखील ही काही पुस्तके २०२२ या वर्षी वाचता आली; परंतु खरे सांगायचे झाले तर झोपडपट्टीपासून तर महालामध्ये राहणाऱ्या राज्यातील नागरिकांना भेटणे व त्यांच्याशी संवाद साधणे हे काम, माझ्या मते ‘महाभारत’ वाचण्यापेक्षा काही कमी नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

महापुरुषांना वाचण्याची संधी दिली
महाराष्ट्राची भूमी ही अनेक प्रकारच्या प्रेरणांचे स्रोत आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कार्य समजून घेण्याची संधी देते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार आदींना वाचून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे हे स्थान आहे. सुरुवातीपासूनच मला महाराष्ट्राने येथील महापुरुषांना वाचण्याची संधी दिली.