सिद्धिविनायकाच्या बातमीत ही माहिती अॅड करणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धिविनायकाच्या बातमीत ही माहिती अॅड करणे
सिद्धिविनायकाच्या बातमीत ही माहिती अॅड करणे

सिद्धिविनायकाच्या बातमीत ही माहिती अॅड करणे

sakal_logo
By

बाणगंगा, मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिरात भाविकांची झुंबड
मुंबादेवी, ता. १ (बातमीदार) : नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परंपरा आजही शहरात प्रकर्षाने पाळली गेली. गिरगाव चौपाटीलगत असलेल्या बाबुलनाथ परिसरातील शिवमंदिर, मुंबादेवी, महालक्ष्मी, माझगावमधील गावदेवी माता, माणकेश्वरमधील पुरातन शिवमंदिर, डोंगरीतील शनी महाराजांचे मंदिर, भायखळा पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस असलेले प्राचीन शिवमंदिर, माहीममधील सातीआसरा देवतेचे मंदिर, प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर, बोरिवलीतील स्वयंभू गणेश इत्यादी मंदिरांत आज दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.
बाणगंगा आणि परिसरात असलेल्या मंदिरांत दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी होती. सुप्रसिद्ध कुलस्वामी खंडोबा देवाच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात भक्त दाखल झाले होते.
मुंबादेवीच्या दर्शनासाठी ठाण्याहून पती-पत्नी अभिजित आणि स्नेहल कांबळे आले होते. रविवार असल्याने ठाण्याहून लवकरच निघालो. वर्षाचा पहिला दिवस आम्ही मुंबईतील मंदिरात आवर्जून येतो. त्यात एक वेगळाच आनंद आणि मनःशांती लाभते असे त्यांनी सांगितले. कळव्यातील राजीव आणि संगीता शर्मा आपली कन्या दिशासह बाणगंगा मंदिरात दर्शनासाठी आले होते. कार्तिक पौर्णिमेला बाणगंगेची आरती पाहायचे राहून गेल्याने आज नववर्ष दिनी खास वेळ काढून आल्याचे त्यांनी सांगितले. महालक्ष्मी मंदिरात आलेले प्रमोद आणि त्यांची पत्नी संगीता गायकवाड दर्शनाने सुखावले होते. मार्गशीष महिन्यात महालक्ष्मीला येण्याचे मनात असूनही जमले नाही. आज नववर्ष आणि रविवार असल्याने सकाळीच महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आलो. तेथून आम्ही बाबुलनाथमधील शिव मंदिरात दर्शन घेऊन नववर्ष दिन साजरा केला असे ते म्हणाले. सायन कोळीवाडा परिसरात राहणारे विनोद आणि वैष्णवी नारकर यांनी आपल्या दोन्ही मुलांसह माहीममधील सातीआसरा मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. देवीची खणा-नारळाने ओटी भरल्यानंतर त्यांनी कुटुंब आणि मुंबईकरांना नववर्षात उत्तम आरोग्य आणि धनसंपदा लाभावी अशी प्रार्थना देवीचरणी केली.
रे रोडहून आलेले वेदिका आणि विनोद वास्कर यांनी डोंगरीतील शनेश्वर महाराज यांच्या मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. शनी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करत आपल्या नववर्षाच्या संकल्पना पूर्ण होवोत अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.


कोळी बांधवांचे साकडे
कुलाबा, कफ परेड, ससून डॉक इत्यादी परिसरातील काही कोळी बांधवांनी आपल्या सजवलेल्या होड्यांचे पूजन करीत नववर्षात भरपूर मासे मिळून व्यवसायाची भरभराट व्हावी म्हणून दर्यासागराला साकडे घातले. नारळ, हार आणि नैवेद्य अर्पण करीत सूर्यनारायणाला अर्घ्य दिले.