पुणे, मुंबई महिलास्नेही शहरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे, मुंबई महिलास्नेही शहरे
पुणे, मुंबई महिलास्नेही शहरे

पुणे, मुंबई महिलास्नेही शहरे

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : महिलांच्या सामाजिक सुरक्षेच्या आणि अर्थार्जनाच्या दृष्टीने देशातील सर्वांत सुरक्षित पाच शहरांमध्ये पुणे आणि मुंबईचा समावेश एका अभ्यास अहवालात महिलास्नेही शहर असा करण्यात आला आहे.
देशातील सुरक्षित शहरांच्या यादीत चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे; तर पुणे, बेगळूरु, हैदराबाद अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. पाचव्या क्रमांकावर मायानगरी मुंबईचा समावेश आहे. महिलांना नोकरीसाठी आणि राहण्यासाठी कोणते शहर सर्वाधिक सुरक्षित आहे या प्रमुख मुद्यावर तब्बल १११ शहरांचे सर्वेक्षण अवतार संस्थेमार्फत करण्यात आले होते. यामध्ये महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण या निकषांबरोबरच करिअर आणि व्यावसायिक वाढीसाठी पोषक वातावरण या मुद्यांचा विचारही यामध्ये करण्यात आला होता. महिलांना नोकरीमध्ये बढती, प्रगती मिळते का, नवीन संधी उपलब्ध आहे का, तसे पोषक वातावरण आहे का, यावर या सर्वेक्षणात आढावा घेण्यात आला.
चेन्नई, पुणे, बेंगळूरु, हैदराबाद आणि मुंबई यांच्यामधील सामाजिक आणि व्यावसायिक समतोलाचा अभ्यासही यानिमित्ताने घेण्यात आला. दक्षिणेकडे असलेल्या राज्यांनी यामध्ये बाजी मारली आहे. तामिळनाडूमधील शहरे आणि केरळमधील प्रतिसाद यासाठी उत्तम आहे.
...
दिल्लीत कमी गुण
दिल्लीला सामाजिक दृष्टीने कमी गुण मिळाले आहेत; तर नागपूर, औरंगाबाद, फरिदाबादही सामाजिक दृष्टीने मागे दर्शवण्यात आले आहेत. पदुच्चरी, सुरत, बिलासपूर यामध्ये सामाजिक संधी असली तरी औद्योगिक पट्टा नसल्यामुळे संधी कमी आहेत.
...
दक्षिण, पश्चिमेत सकारात्मक वातावरण
सामाजिक आणि करिअरनिहाय उत्तम वातावरण, प्रगतीचे संकेत, व्यावसायिक संधी, सुरक्षितता यातून या शहरांचा अभ्यास प्रश्नार्थक स्वरूपात घेण्यात आला. दक्षिण आणि पश्चिम भागांत महिलांना सकारात्मक वातावरण तुलनेने अधिक आहे असे आढळले आहे. काही शहरे सामाजिक दृष्टीने सुरक्षित; पण व्यावसायिक संधी मर्यादित अशा स्वरूपात आहेत.
...
टॉप फाईव्ह राज्ये
लोकसंख्या हा मुद्दादेखील यामध्ये विचारात घेतला आहे. सुमारे एक कोटी लोकसंख्या असण्यापासून विविध प्रकारे यावर भाष्य करण्यात आले आहे. पश्चिम विभागात पुणे, मुंबई, अहमदाबाद; तर उत्तर विभागात दिल्ली, श्रीनगर आणि अमृतसर या शहरांचा अग्रक्रम आहे. याशिवाय राज्य पातळीवर विचार करताना केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये टॉप फाईव्हमध्ये आहेत. विविध शासकीय संस्था, आकडेवारी आणि माहितीचा आधार या सर्वेक्षणात घेण्यात आला आहे.