
मुंबईत महिलांसाठी मोबाईल टॉयलेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईत महिलांसाठी मोबाईल टॉयलेट सुरू करण्यात आले आहे. पालिकेचा पायलट प्रोजेक्ट सीएसएमटीला सुरू करण्यात आला असून यामुळे महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. सध्या एकाच ठिकाणी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याला मिळणारा प्रतिसाद बघून नंतर त्यात वाढ करण्यात येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
पालिकेच्या ए विभाग कार्यालयाकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. एका मोठ्या बसला मोडीफाय करून त्याला महिला टॉयलेटचे रूप देण्यात आले आहे. पालिकेने मधुमिता फाऊंडेशनच्या माध्यमातून सीएसएमटी येथील बेस्ट बस आगारामध्ये हा प्रकल्प सुरू केला आहे. प्रतिसाद बघून त्यात वाढ केली जाईल, असे मधुमिता फाऊंडेशनच्या मुंबई व्यवस्थापक स्नेहा पांचाळ यांनी सांगितले.
मोठ्या आकाराच्या बसमध्ये ‘ती’ नावाचे हे महिलांसाठीचे शौचालय सुरू करण्यात आले आहे. चार सीट, एक कमोड बसवण्यात आले आहे. याशिवाय दोन वॉश बेसिन आहेत. बसमध्ये महिलांसाठी बसण्याची व्यवस्थादेखील असून महिलांना कपडे बदलणे आणि लहान मुलाला स्तनपानही करता येणार आहे. सध्या या शौचालयाच्या वापारासाठी पाच रुपये दर आकारला जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली आहे.
...
‘कॅफे’चीही व्यवस्था :
महिला शौचालयाची व्यवस्था ही बसच्या पुढील अर्ध्या भागात करण्यात आली आहे; तर मागील अर्ध्या भागात महिलांसाठी ‘कॅफे’ची व्यवस्था असणार आहे. या ठिकाणी महिलांना आपल्या आवडीचा आहार किंवा खाद्य पदार्थ घेता येणार आहेत. अद्याप ही सेवा सुरू करण्यात आलेले नाही.