बाईक टॅक्सीप्रकरणी निर्णय घ्यायला हवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाईक टॅक्सीप्रकरणी
निर्णय घ्यायला हवा!
बाईक टॅक्सीप्रकरणी निर्णय घ्यायला हवा!

बाईक टॅक्सीप्रकरणी निर्णय घ्यायला हवा!

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : राज्यात बाईक टॅक्सी चालवण्याची परवानगी देण्याबाबत चालढकल करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने आज खडे बोल सुनावले. सरकारला याबाबत काही तरी निर्णय घ्यायला हवा; धोरण आखले नाही, अशी सबब देता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
रॅपिडो बाईक टॅक्सी ॲपच्या निमित्ताने बाईक टॅक्सीचा मुद्दा उच्च न्यायालयात याचिकेद्वारे उपस्थित झाला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत धोरण करण्यासाठी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते; मात्र याबाबत सरकारने अद्याप धोरण निश्चित केले नाही. आज न्या. गौतम पटेल आणि न्या. एस. जी. डिगे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची भूमिका मांडली. विनापरवाना बाईक टॅक्सी चालवण्यासाठी परवानगी नाही; कारण अद्याप यावर धोरण किंवा नियमावली तयार केली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एका कंपनीला याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असेही त्यांनी सांगितले; मात्र यावर खंडपीठाने असमाधान व्यक्त केले.
प्रत्येक शहर, जिल्ह्यात यासाठी नियम भिन्न असतील, पण त्यासाठी सरकारने सुरुवात करायला हवी, असे खंडपीठाने सुचवले. धोरण निश्चित होईपर्यंत बाईक टॅक्सींना मनाई करण्याची मागणी राज्य सरकारने केली. राज्यात सुरू असलेल्या सर्व बाईक टॅक्सीची माहिती दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सर्व टॅक्सीचालकांना समान नियम लागू हवा, जर सुरक्षाविषयक नियम नसेल, तर सरसकट परवानगी द्यायला नको, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि पुढील सुनावणी १३ जानेवारीला निश्चित केली.
---
धोरणाअभावी परवानगी नाकारणे योग्य नाही!
बाईक टॅक्सीचालकांना अशाप्रकारे अधांतरी ठेवता येणार नाही, सरकारने धोरण ठरवण्यासाठी काही तरी निर्णय तातडीने घ्यायला हवा. धोरण येईपर्यंत बाईक टॅक्सीला परवानगी नाही आणि धोरण कधी येणार याची माहिती नाही, असे होऊ शकत नाही. सरकार या मुद्द्यावर परवानगी नाकारू शकत नाही. सरकारला यामध्ये अडचणी असतील; पण तात्पुरता का होईना, तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
----