‘हिमालय’चा सामाजिक संस्थेला फटका

‘हिमालय’चा सामाजिक संस्थेला फटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : सीएसएमटी येथील कोसळलेल्या हिमालय पादचारी पुलाचा फटका येथील सामाजिक संस्थेला बसला आहे. या पुलाखाली कार्यालय असणाऱ्या ३० वर्षे जुन्या संस्थेला थेट माहुल परिसरात जागा देण्यात आली आहे. हा परिसर सीएसएमटीपासून सुमारे १५ किमी दूर असल्याने त्याचा परिणाम संस्थेच्या कामावर होणार आहे. त्यामुळे संस्थेचे बदली कार्यालय याच परिसरात द्यावे, अशी मागणी संस्थेकडून होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या पादचारी पुलाला हिमालय ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. २०१९ मध्ये पूल अचानक कोसळून त्यात सात जणांचा मृत्यू झाला; तर ३३ जण जखमी झाले होते. घटनेनंतर जवळपास चार वर्षे झाली असून पुढील काही दिवसांत नवीन पादचारी पूल सुरू होणार आहे. या पुलाखाली ३० वर्षांपासून कार्यरत असलेले डे केअर सेंटर मात्र १५ किमी दूर अंतरावर माहुल येथे हलवण्यात आले आहे. ‘एनजीओ सपोर्ट’ नामक या सेंटरमध्ये बेघर लहान मुले, व्यसनाधीन तरुणांसाठी ही संस्था डे केअर होम चालवते. १९९३ पासून या संस्थेचे कार्यालय पुलाखाली होते. ६-२५ वर्षे वयोगटातील मुले आणि तरुणांची काळजी या संस्थेमध्ये घेतली जाते. इतकेच नाही, तर ज्यांना अमली पदार्थांचे व्यसन होते, त्यांच्यावर उपचार आणि त्यांचे पुनर्वसनही केले जाते.
...
२५-३० मुलांचा आधार
सीएसएमटी रेल्वे स्थानकात देशभरातून दररोज अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येतात. त्यातून अनेक लहान मुले येत असतात. रेल्वे स्थानकाजवळच संस्थेचे कार्यालय असल्याने कार्यकर्ते अशा लहान मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत सहज पोहोचू शकत होते. घरातून पळून आलेल्या मुलांचे प्रमाण यात अधिक असते. सीएसएमटी आणि जवळपासच्या भागात दररोज ७-८ नवीन मुले येत असल्याने २५-३० मुले दररोज केंद्रात बघायला मिळायची. अशा मुलांसाठी हे केंद्र मोठा आधार ठरले होते. आता मात्र केंद्र स्थलांतरित झाल्याने अशा मुलांना आता तेथे जाणे कठीण झाले आहे.
...
२,५०० हून अधिक जणांचे पुनर्वसन
संस्थेने गेल्या ३० वर्षांत २,५०० हून अधिक मुले आणि तरुणांचे पुनर्वसन केले आहे; मात्र नवीन केंद्र रेल्वे स्थानकापासून लांब असल्याने, एवढ्या लांबचा प्रवास करून काम करण्यात कार्यकर्त्यांना अडचणी येणार असल्याचे एनजीओ सपोर्टचे कार्यकारी संचालक राजेश नैनाकवाल यांचे म्हणणे आहे.
...
मुलांकडून चौकशी
सध्या सीएसएमटी येथे केंद्र नसले तरी अनेक मुले माहिती घेण्यासाठी येत असल्याचे केंद्राचे प्रभारी अजाज खान सांगतात. ते स्वतः १९८८-८९ मध्ये केंद्रात आल्यानंतर पुनर्वसित झालेल्या तरुणांपैकी एक आहेत. पूल कोसळल्यानंतर हे बांधकाम प्रथम ऑडिटसाठी बंद करण्यात आले. त्यानंतर पुलाचा उर्वरित भाग खाली आणण्यात आला आणि डे केअरही पाडण्यात आले. २०२१ मध्ये एनजीओला माहुल येथे केंद्र चालवण्यास सांगितले होते. आम्ही याच परिसरात पुनर्वसन करावे यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी पत्रव्यवहारही केला असल्याचे त्यांनी सांगितले.
...
हे सारे बंद होईल!
हे केंद्र म्हणजे अनेक मुलांचे आधार केंद्र होते. येथे मुले प्रशिक्षणासाठी विविध उपक्रमांतही भाग घेत होती. विविध खेळ खेळणे, टीव्ही पाहणे, आंघोळ, आराम, झोपणेदेखील होत होते. अनेक मुले संस्थेमध्ये येऊन वेळ घालवत असल्याने अमली पदार्थांपासून दूर राहत होती. आता हे सर्व बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे कार्यालयाला पर्यायी नवीन जागा याच परिसरात किंवा एखाद्या रेल्वे स्थानकाजवळ द्यावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com