नायर दंत रुग्णालयात आधुनिक पद्धतीने चिकित्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नायर दंत रुग्णालयात आधुनिक पद्धतीने चिकित्सा
नायर दंत रुग्णालयात आधुनिक पद्धतीने चिकित्सा

नायर दंत रुग्णालयात आधुनिक पद्धतीने चिकित्सा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : मुंबई महापालिकेचे नायर दंतचिकित्सा वैद्यकीय महाविद्यालय ‘डिजिटलाईज्ड महाविद्यालय’ होणार आहे. रुग्णालयात कॉम्प्युटर एडेड डिझाइन (सीएडी) आणि कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग (सीएएम) तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. त्यामुळे कृत्रिम दात बसवण्यापासून ते इतर दंत चिकित्सेपर्यंतचे उपचार सुलभ आणि जलद रितीने करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रमुख रुग्णालयाच्या संचालक व नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.

सीएडी, सीएएम प्रणालीमुळे कृत्रिम दात तयार करण्यासाठी संगणकाचा वापर शक्य होणार आहे. तसेच तोंडातील स्कॅनिंग, नोंदी वापरून दंतचिकित्सक तोंडामध्ये इम्प्रेशन बसविणे, त्यावर दात बसविणे या पारंपरिक पद्धतींचा वापर करण्याऐवजी जबड्याचे डिजिटल थ्रीडी इफेक्टने दंतपंक्तीचे साचे मिळवू शकतो. हे तंत्रज्ञान रुग्णाचे दात आणि हिरड्या, तोंडातील ऊतींना संगणकाच्या स्क्रीनवर थ्रीडी प्रतिमेमध्ये तयार करते. या थ्रीडी प्रतिमेतून सॉफ्टवेअरच्या मदतीने अंतिम दंतपंक्ती तयार केली जाते. हा सर्व डेटा मिलिंग मशीनमध्ये हस्तांतरित केला जातो. यात धातू किंवा सिरॅमिकच्या एकाच ब्लॉकमधून कॅप्स, ब्रिज, दंतपंक्तीला हवा तसा आकार देणे सहज शक्य होणार आहे.

दंतपंक्तीच्या सर्व प्रक्रिया एकाच प्रयोगशाळेत शक्य आहेत. हे तंत्रज्ञान पारंपरिक, मॅन्युअल फॅब्रिकेशन प्रक्रियेत आवश्यक असलेल्या दोन ते तीन आठवड्यांऐवजी दोन ते पाच दिवसांच्या कालावधीत होणार आहे. तोंडाच्या कर्करोगामुळे किंवा म्युकरमायकोसिस यांसारख्या आजारांमुळे रुग्णांच्या जबड्याच्या हाडांचे महत्त्वपूर्ण भाग गमावल्यास, डिजिटल तंत्रज्ञान कलम आणि कृत्रिम अवयवांचे रोपण करण्यात मोठी मदत होऊ शकते, असे डॉ. अंद्राडे यांनी सांगितले.

नायर दंत रुग्णालय ९०व्या वर्षात पदार्पण करत असून देशातील दुसरे सर्वात जुने रुग्णालय आहे. या प्रकल्पासाठी महानगर गॅस लिमिटेडकडून सीएसआर पद्धतीने निधी उपलब्ध झाल्याने मदत झाली आहे. त्याचसोबत पालिकेकडून दंत उपकरणेदेखील मिळाली आहेत.
- डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका