
परदेशातील प्रकल्पांची कामे एलअँडटीला
मुंबई, ता. १५ : लार्सन अँड टुब्रोच्या इंजिनिअरिंग विभागाला अमेरिका, मेक्सिको, उझबेकिस्तान आदी देशांमधील मोठ्या प्रकल्पांची विविध कामे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मिळाली आहेत. मेक्सिकोमधील एका रिफायनरीचा रिअॅक्टर तसेच स्क्रू प्लग हिट एक्स्चेंज तयार करण्याचे मोठे काम कंपनीला मिळाले आहे. त्याखेरीज अमेरिका व उझबेकिस्तानातील ब्लू अमोनिया प्रकल्पातील रिअॅक्टर आणि व्हेसल्स बनवण्याचे कामही कंपनीला मिळाले आहे. तसेच एका युरोपीय देशातील प्रक्रियाविषयक कारखान्यातील उपकरणे बनवण्याचे कामही कंपनीला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय तीव्र स्पर्धेला तोंड देऊन आपल्या दर्जेदार कामगिरीच्या आधारावर एल अँड टीने ही कामे मिळवली असल्याचे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले; तर भारतातही इंडियन ऑईलच्या पानिपत येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प विस्तार प्रकल्पाची काही कामे एल अँड टीने मिळवली आहेत. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत धोरणानुसार ही कामे एल अँड टीला देण्यात आली. तसेच भारतातील एका युरिया प्रकल्पाची सुधारणा करण्याचे कामही एल अँड टीला मिळाले. त्यामुळे या पन्नास वर्षे जुन्या प्रकल्पाची विश्वासार्हता आणि सुरक्षितता वाढेल. तसेच त्याची क्षमता वाढवून तो यापुढे कमी ऊर्जेवर काम करेल.